टोकियो : जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये भारताच्या मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी या जोडीने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या मलेशियन जोडीला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मलेशियाची गोह शेम आणि टॅन वी किऑँग ही जोडी जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असून त्यांना पराभूत करून भारतीय जोडीने खळबळ उडवून दिली.

दुहेरीमध्ये भारताच्या मनू आणि सुमीत या जोडीने पिछाडीवर पडूनदेखील सामना जिंकल्याने त्यांच्या या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सामन्याच्या प्रारंभानंतर भारतीय जोडीने पहिला गेम गमावला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येदेखील ते १७-१९ असे पिछाडीवर पडल्यामुळे ऑलिम्पिक उपविजेतेच त्यांच्यावर मात करतील अशी स्थिती निर्माण झाली. मात्र तिथून सामन्याची सूत्रे हातात घेत दोघांनी त्या गेमसह तिसरा निर्णायक गेमदेखील जिंकून घेत सामना खिशात घातला. ५४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय जोडीने मलेशियन जोडीचा १५-२१,२३-२१,२१-१९ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत या जोडीचा सामना चीनच्या हे जितिंग आणि टॅन क्विआंग यांच्याशी होणार आहे. मात्र सात्विकसाईराज रॅन्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी तसेच अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी या दोन्ही जोडय़ा आपापल्या गटात पराभूत झाल्या आहेत.

भारताच्या पी.व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय या विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांचे एकेरीचे सामने गुरुवारी होणार आहेत. श्रीकांतला हॉँगकॉँगच्या वुंग विंग याच्याशी होणाऱ्या सामन्यात आशियाईतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार आहे, तर प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीला संमिश्र गटात मलेशियाच्या चॅन पेंग सून आणि गोह लि यिंग यांच्याशी सामना करावा लागणार आहे.