नवी दिल्लीत पार पडलेल्या नेमबाजी विश्वचषकानंतर सुवर्णपदकाची कमाई केलेल्या मनू भाकेर-सौरभ चौधरी जोडीने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरीची नोंद केली आहे. चीन तैपेईत सुरु असलेल्या १२ व्या आशियाई एअरगन चॅम्पियनशीप स्पर्धेत मनू-सौरभ जोडीने सुवर्णपदक पटकावलं आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात विश्वविक्रमी कामगिरी करत दोन्ही खेळाडूंनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

पात्रता फेरीत भारतीय जोडीने ७८४ गुणांची कमाई करत, रशियाच्या जोडीचा विक्रम मोडीत काढला. काही दिवसांपूर्वी झालेल्या युरोपियन चॅम्पियनशीप स्पर्धेत रशियाच्या व्हिटॅलीना आणि आर्टेम जोडीने ४८४.८ गुण कमावले होते. आजच्या स्पर्धेत कोरियन जोडीला रौप्य तर चीन तैपेई जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. याच प्रकारात भारताच्या अनुराधा आणि अभिषेक वर्मा जोडीने अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यांना ३७२.१ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.