अर्जेंटीनातील ब्युनास आयर्स येथे सुरु असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची युवा नेमबाजपटू मनू भाकेरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेतलं नेमबाजी प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात १६ वर्षीय मनूने २३६.५ गुणांची कमाई करत आपलं पहिलं स्थान कायम राखलं. आशियाई खेळांमध्ये मनू भाकेरची कामगिरी निराशाजनक झाली होती, यानंतर मनूने जोरदार कमबॅक करत युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत १०. १०.१, १०.४ अशी सर्वोत्तम कामगिरी करत मनूने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना वरचढ होण्याची संधीच दिली नाही. रशियाच्या इयाना एनिनाने रौप्यपदक तर जॉर्जियाच्या निनो खुत्सिबेरित्झने कांस्यपदक मिळवलं.