न्यूयॉर्क : अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा खेळवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. करोना विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेतली तरच अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा ठरल्याप्रमाणे ३१ ऑगस्टपासून होऊ शकते. अर्थातच कशा प्रकारे काळजी घ्यावी लागेल याबाबत अधिकृतपणे निर्णय झालेला नाही.

सहभागी खेळाडूंचा विशेष विमानाने प्रवास अनिवार्य, प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी करोना चाचणी, दररोज शरीराचे तापमान पाहणे अनिवार्य असू शकते. खेळाडूंना प्रवास करताना त्यांचा नेहमीचा सहकाऱ्यांचा संघ सोबत घेऊन येता येणार नाही. त्याशिवाय स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना प्रवेश नसेल. टेनिस कोर्टवर अधिकारीदेखील कमी संख्येने असू शकतील. सरावादरम्यान लॉकर रूमचा वापर खेळाडूंना करण्यावर निर्बंध येऊ शकतात. ‘‘अमेरिकन खुली स्पर्धा जर नियोजित वेळेत झाली तर कोणते निर्बंध असतील याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सर्व काही अंदाजाने बोलले जात आहे. जूनच्या मध्यावर किंवा  महिन्याच्या अखेपर्यंत अमेरिकन खुली स्पर्धा खेळवण्याबाबतचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे,’’ असे अमेरिकन टेनिस संघटनेच्या मुख्य अधिकारी स्टॅसी अ‍ॅलेस्टर यांनी सांगितले.

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा १९४५ नंतर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच यंदा रद्द झाली. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा अमेरिकन स्पर्धा झाल्यानंतर होणार असल्याचे सध्या तरी जाहीर करण्यात आले आहे. जुलैपर्यंत टेनिसच्या सर्व स्तरावरील स्पर्धा करोनामुळे रद्द झाल्या आहेत. न्यूयॉर्कचे राज्यपाल अँडय़ू क्युमो यांनी प्रेक्षकांशिवाय व्यावसायिक क्रीडा स्पर्धा सुरू करण्याला परवानगी दिली आहे. या स्थितीत अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा झाल्यास प्रेक्षकांना प्रवेश मिळेल की नाही याबाबत आताच निर्णय घेता येणार नाही, असे अ‍ॅलेस्टर यांनी म्हटले.