नदीमध्ये वास्तव्य करणारा मासा जेव्हा सागरात जातो, तेव्हा त्याची अवस्था संभ्रमात सापडल्यासारखी असते. नवोदित खेळाडू जेव्हा स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होतो, तेव्हा तो अतिशय भांबावलेल्या स्थितीत असतो. त्याला गरज असते ती आत्मविश्वास निर्माण करण्याची व आगामी आव्हानांना सकारात्मक वृत्तीने सामोरे जाण्याची. पुण्यात गेली आठ वर्षे सुरू असलेल्या एमजे करंडक जलद बुद्धिबळ स्पर्धेद्वारे नवोदित व उदयोन्मुख खेळाडूंना या दृष्टीनेच चांगले व्यासपीठ दिले आहे.

आपल्या देशात बुद्धिबळासाठी विपुल नैपुण्य उपलब्ध आहे. या नैपुण्याला शिस्तबद्ध स्पर्धात्मक अनुभवाची जोड लाभली, तर ते केवळ देशात नव्हे तर परदेशातही तिरंगा फडकवू शकतात, हे सांगली येथील क्रीडामहर्षी कै. भाऊसाहेब पडसलगीकर, पुण्याचे मोहन फडके आदी ज्येष्ठ प्रशिक्षकांना नेहमी वाटत असे. त्यांच्याकडून स्फूर्ती घेत आंतरराष्ट्रीय मास्टर जयंत गोखले यांनी २००९ मध्ये दर रविवारी जलद डावांची स्पर्धा आयोजित करण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणला. एका मालिकेत ५२ रविवारी स्पर्धा घेण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वीही ठरला. तो अद्याप सुरू आहे. या स्पर्धेसाठी वयाची कोणतीही अट नाही. त्यामुळे चार वर्षीय खेळाडूंपासून ऐंशीहून जास्त वय झालेल्या खेळाडूंनीही भाग घेतला आहे. अर्थात प्रत्येक वयोगटातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी या स्पर्धेतील ८, १०, १२, १४ व १६ वर्षांखालील गटांकरिता प्रत्येकी तीन बक्षिसे, त्याखेरीज खुल्या गटात पहिले पाच क्रमांक मिळविणारे खेळाडू, सवरेत्कृष्ट महिला व ज्येष्ठ खेळाडूंकरिता विशेष बक्षिसे दिली जातात.

स्पर्धेच्या पहिल्या मालिकेत सुरुवातीला अनेक नवोदित खेळाडूंना मानांकित किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा असलेल्या खेळाडूंबरोबर डाव खेळताना भीती वाटत असे किंवा दडपण येत असे. मात्र हळूहळू या खेळाडूंची भीती नाहीशी झाली. कोणत्याही वयाचा खेळाडू आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा असलेल्या खेळाडूला बिनधास्तपणे लढत देऊ लागला आहे. स्पर्धामधील अनुभवाचा फायदा त्यांना राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये आत्मविश्वासाने खेळण्यासाठी होऊ लागला आहे. कोणतीही स्पर्धा असली, तरी भक्कम मानसिक तंदुरुस्ती ठेवीत व आत्मविश्वासाने हे खेळाडू खेळू लागले आहेत, हीच या मालिकेने बुद्धिबळ खेळासाठी दिलेली सर्वोच्च देणगी आहे. अगदी तळागाळातील खेळाडूही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेत असतात. आपल्या पाल्यात चांगले नैपुण्य आहे व त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, हा विश्वासही या खेळाडूंच्या पालकांमध्ये या स्पर्धामुळे निर्माण झाला आहे.

कोणतीही स्पर्धा आयोजित करणे ही काही सोपी गोष्ट नाही. मात्र गेली आठ वर्षे या स्पर्धेचे सातत्य टिकविण्यात जयंत गोखले यांना उद्योजक मिलिंद मराठे, आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे, दीप्ती शिदोरे, राष्ट्रीय पंच अमित सोहोनी, हर्षद हगवणे, अरविंद मोरे, श्रीनाथ हगवणे, सुरेश गोखले, दीप्ती गोखले, स्वाती शिदोरे यांचे नेहमीच सहकार्य लाभत असते.

परदेशी खेळाडूंचाही सहभाग

या स्पर्धेची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नसून पुण्यात येणाऱ्या काही परदेशी खेळाडूंनीही आपला सहभाग नोंदविला आहे. इंग्लंड, श्रीलंका व ऑस्ट्रेलियातील काही खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेत एकदिवसीय स्पर्धेत आनंद घेतला आहे. या स्पर्धेत पुणे, मुंबई, नाशिक, सांगली, सोलापूर, अहमदनगर, शिरूर, जळगाव, नागपूर, लखनौ, भोपाळ, नवी दिल्ली, पणजी, जयपूर, तिरुवअनंतपुरम आदी ठिकाणचे खेळाडू सहभागी होत असतात. प्रत्येक रविवारी सात ते आठ फे ऱ्यांची स्पर्धा आयोजित केली जाते व साधारणपणे ऐंशी खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी चुरस असते. त्यामध्ये पन्नासहून अधिक मानांकन लाभलेले खेळाडू असतात.

नामवंतांचाही सहभाग

उदयोन्मुख खेळाडूंबरोबरच नामवंत खेळाडूंनाही या स्पर्धेत सहभागी होण्याचा मोह टाळता आलेला नाही. त्यामध्ये समीर काठमाळे, अभिषेक केळकर, वेदान्त पिंपळखरे, श्रीनाथ कृष्णमूर्ती, श्रीनाथ राव, शंतनू भांबुरे, हर्षित राजा, चिन्मय कुलकर्णी, संकर्ष शेळके, अनिरुद्ध देशपांडे, श्रीराम सर्जा, शैलेश जयस्वाल, किरण पंडितराव रवी बेहेरे, प्रकाश करमरकर, स्नेहल महाजन, के. के. खरे, रवींद्र नरगुंदकर, एल.पी. खाडिलकर, लक्ष्मण खुडे आदी खेळाडूंचा समावेश आहे.

मान्यवरांकडून मौलिक मार्गदर्शन

जलद स्पर्धाची ही मालिका २००९ पासून सुरू असून या स्पर्धेस अनेक क्रीडातज्ज्ञांनी भेट देत नवोदित खेळाडूंना मौलिक मार्गदर्शनही केले आहे. त्यामध्ये बुद्धिबळमहर्षी कै. भाऊसाहेब पडसलगीकर, ज्येष्ठ क्रीडातज्ज्ञ कै.डॉ. भीष्मराज बाम, बुद्धिबळ प्रशिक्षक मोहन फडके, आंतरराष्ट्रीय खेळाडू डी.व्ही.प्रसाद, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, विदित गुजराथी, सूर्यशेखर गांगुली, आर. ललितबाबू, अरविंद चिदंबरम, ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुपमा गोखले, एस. विजयालक्ष्मी, स्वाती घाटे, मेरी अ‍ॅन गोम्स, कृत्तिका नाडिग, ईशा करवडे, संघटक रवींद्र डोंगरे, संजय केडगे, लक्ष्मीकांत खाबिया, केदार वांजपे, संजय देशपांडे, आनंद इंगळे, देबश्री मराठे-दांडेकर, आमदार विजय काळे, प्रा. शैलेश आपटे, रशियन प्रशिक्षक फारुख अमानोतोव्ह यांचा समावेश आहे.

कामगिरी उंचावली

स्पर्धाच्या मालिकेत अभिमन्यू पुराणिक व आकांक्षा हगवणे यांना फारसे चांगले यश मिळाले नव्हते. मात्र दुसऱ्या मालिकेत अभिमन्यू याने एक डझनपेक्षा जास्त वेळा अजिंक्यपद पटकावीत सर्वोत्तम मालिकावीर हा मान मिळविला. त्याने या स्पर्धामधील अनुभवाचा फायदा घेत प्रथम आंतरराष्ट्रीय मास्टर व त्या पाठोपाठ ग्रँडमास्टर किताबालाही गवसणी घातली आहे. आकांक्षा हिने येथील अनुभवाचा फायदा घेत सबज्युनिअर व १७ वर्षांखालील गटात राष्ट्रीय विजेतेपदे मिळविली. तिने कनिष्ठ गटात जागतिक स्पर्धेचे विजेतेपदावर मोहोर नोंदविली आहे. तिने आंतरराष्ट्रीय महिला मास्टर किताबही मिळविला असून नुकताच तिने महिला ग्रँडमास्टरचा पहिला निकष पूर्ण केला आहे. या दोन खेळाडूंबरोबरच आर्यन शाह, केवल निर्गुण, दिगंबर जाईल, अनुज दांडेकर, आर्यन सिंगाला, रिया मराठे, निखिल दीक्षित, आदिती कयाळ, मिहीर सरवदे, आदिती व्हावळ, धैवत आपटे, अमित धुमाळ, विराज अग्निहोत्री, कुशाग्र जैन, आदित्य सामंत, अमोघ कुंटे आदी खेळाडूंच्या मानांकनांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. तसेच हे खेळाडू राज्य व अखिल भारतीय स्तरावरील विविध स्पर्धामध्ये अव्वल कामगिरी करू लागले आहेत.