उपांत्यपूर्व फेरीत इराणची एकाकी चढाई; घाना व माली या आफ्रिकन संघांमध्ये चुरस; स्पेन, जर्मनी व इंग्लंड यांचा पगडा; ब्राझील व अमेरिकेची कसोटी

कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा प्रवास अंतिम टप्प्याच्या दिशेने झुकत चालला आहे. २४-१६-८-४-२-१ हे जेतेपदाच्या दिशेने जाणाऱ्या समीकरणाचा प्रवास मध्यंतरापर्यंत आला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत कोणते संघ मुसंडी मारतील याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फुटबॉल स्पर्धा म्हटले की युरोप आणि आफ्रिका खंडातील देशांची मक्तेदारी ही ओघानेच आली. भारतात सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतही त्याची प्रचीती येत आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेल्या आठपैकी तीन संघ हे युरोपातील आहेत, तर आफ्रिका खंडातील दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई रंगणार आहे. ‘फुटबॉलची पंढरी’ समजल्या जाणाऱ्या ब्राझीलचा अंतिम आठ संघांमधील प्रवेश अपेक्षितच होता, तर उत्तर, मध्य अमेरिका आणि कॅरेबियन गटातील अमेरिकेने सर्वाना अचंबित केले आहे. मात्र या सगळ्या वर्चस्वाच्या लढाईत आशिया खंडाची पताका डौलाने फडकवण्याची जबाबदारी इराणने आपल्या खांद्यावर घेतली आहे.

आशिया खंडातील भारतात सुरू असलेल्या या स्पर्धेत पाचपैकी केवळ एकच आशियाई देश उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवतो, ही खरी शोकांतिका आहे. इराणने आशिया खंडाचे अस्तित्व आतापर्यंत तरी कायम राखले आहे. इराणने साखळी गटातील दुसऱ्याच लढतीत फुटबॉल कौशल्याची खाण असलेल्या जर्मनीला धूळ चारली. इराणने सर्व आघाडय़ांवर वर्चस्व राखत माजी विजेत्या मेक्सिकोला सहज पराभूत करून पहिल्यांदा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गोल करण्याच्या सर्वाधिक संधी निर्माण करण्याबरोबरच प्रतिस्पर्धी संघांचे आक्रमण थोपवण्यात इराण आघाडीवर आहे. त्यांनी चार सामन्यांत १२ गोल केले आहेत, तर त्यांच्याविरोधात केवळ दोन गोल झाले आहेत. त्यामुळे आक्रमणाबरोबरच इराणने आपली बचाव फळीही मजबूत ठेवली आहे. त्यांचा गोलरक्षक अली घोलम झादेहने १४ गोल अडवले आहेत. आपल्या उंचीचा आणि शारीरिक तंदुरुस्तीचा सुरेख वापर त्यांनी या स्पर्धेत केला आहे.

कुमार विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात स्पेनला तीनवेळा जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. मात्र यावेळी त्यांना जेतेपदाचा प्रबळ दावेदार समजले जात आहे. युरोपियन १७ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या स्पेनने साखळी फेरीत ब्राझीलविरुद्धचा पराभव वगळता अन्य लढतीत सहज विजय साकारले आहेत. चेंडू सर्वाधिक काळ आपल्याकडे ठेवत प्रतिस्पर्धी संघांचे मानसिक खच्चीकरण करायचे, ही त्यांची साधीसरळ रणनीती. पण ६३ वेळा गोल करण्याचे प्रयत्न करूनही त्यांच्या खात्यात केवळ ९ गोल आहेत. आक्रमणाबरोबरच बचावफळी मजबूत ठेवण्यावर त्यांनी विशेष लक्ष दिले. युरोपातील इंग्लंड आणि जर्मनी यांनीही उपांत्यपूर्व फेरीत जोरदार मुसंडी मारली आहे. यामध्ये इंग्लंडची कामगिरी उजवी ठरते. अपराजित इंग्लंडने चेंडूवरील ताबा़, गोल करण्याचे प्रयत्न आणि मजबूत बचाव या सर्व आघाडय़ांवर इतर संघाना मागे टाकले आहे. जॅडॉन सँचो हा प्रमुख खेळाडू मायदेशी परतला असला तरी त्यांच्याकडे दुसऱ्या फळीतही सरस खेळाडू आहेत. एंजल गोमेस व डॅनिएल लोडर यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. जर्मनीला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी ब्राझिलच्या खडतर आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. स्पर्धेतील त्यांची कामगिरी फार साजेशी झालेली नाही. कर्णधार जॅन-फिएट अर्प आणि गोलरक्षक ल्युका प्लोगमन यांच्याभोवतीच हा संघ मर्यादित वाटतो. चार सामन्यांत त्यांनी नऊ गोल केले असले तरी प्रतिस्पर्धीना रोखण्यात ते अपयशी ठरले आहेत. प्रतिस्पर्धीनी त्यांच्याविरोधात सहा गोल केले आणि ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.

या स्पर्धेत आफ्रिकेचे आव्हान कायम राखणाऱ्या माजी विजेत्या घाना आणि गतउपविजेत्या माली यांच्यातच उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगणार आहे. चपळता, चेंडूवर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य आणि कलात्मक पदलालित्य ही या संघांची बलस्थाने. यापूर्वी अनेक स्पर्धामध्ये त्यांनी एकमेकांचा सामना केला असल्यामुळे उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फुटबॉलचा कलात्मक आस्वाद अनुभवायला मिळणार हे नक्की. अमेरिकेच्या बाबतीत काही ठोस विधान करणे अवघड ठरेल. प्रतिस्पर्धी संघानुसार रणनीती बदलण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच कधी ते बचावात्मक पवित्र्यात असतात तर कधी आक्रमकाच्या. कर्णधार जोश सरजट आणि टीम वीह ही त्यांची प्रमुख अस्त्रे आहेत. ब्राझीलच्या प्रत्येक खेळाडूच्या नसानसांत फुटबॉल भिनलेले असल्यामुळे त्यांच्यासाठी सर्वच विजयवीर आहेत. ब्रेनर आणि लिंकोन यांच्यावर विशेष लक्ष असेल.