यजमान इंग्लंडला सलामीच्या लढतीत सहज पराभूत केल्यानंतर भारतीय महिला संघापुढे विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या लढतीत आव्हान असेल ते वेस्ट इंडिजच्या संघाचे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ३५ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधाना, पूनम राऊत आणि कर्णधार मिती राज यांनी दमदार फलंदाजी केली होती. स्मृतीने आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडची गोलंदाजी बोथट केली होती. पूनमने संयतपणे खेळ करत संघाच्या धावसंख्येत भर घालण्याचे काम चोख केले होते. त्यामुळे या सामन्यातही स्मृती आणि पूनम या दमदार सलामी देतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीला एकेरी-दुहेरी धावांवर भर देत मितालीने स्थिरस्थावर झाल्यावर आक्रमक फटकेबाजी केली होती. या सामन्यात तिने सलग सातवे अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात स्मृती, पूनम आणि मिताली यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल.

गोलंदाजीमध्ये झुलन गोस्वामी अनुभवाच्या जोरावर टिच्चून मारा करत आहे. झुलनला शिखा पांडेची सुरेख साथ मिळू शकते. गेल्या सामन्यात फिरकीपटू दीप्ती शर्माने तीन बळी मिळवले होते, त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात तिच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.

ट्वेन्टी-२० विश्वचषक पटकावणारा वेस्ट इंडिजचा संघ या स्पर्धेत पहिल्या विजयाच्या शोधात आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ मैदानात पूर्णपणे झोकून देईल. अनिसा मोहम्मद, दिएंद्रा डॉटीन आणि स्टेफनी टेलर या दोन्ही अनुभवी खेळाडू वेस्ट इंडिजच्या संघात आहेत. या दोघांकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. खासकरून डॉटीनकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे आणि ते तिने बऱ्याचदा दाखवून दिले आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात डॉटीन कशी कामगिरी करते, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

  • सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.
  • प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी.