प्रो कबड्डी लीगमधील प्रशिक्षकांचे मत

तंदुरुस्ती आणि दुसरी फळी हीच यशाची गुरुकिल्ली ठरेल, असे मत विविध संघांच्या प्रशिक्षकांनी शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पाचव्या हंगामाबाबत व्यक्त केले आहे. तीन महिने चालणाऱ्या यंदाच्या हंगामात १२ संघ १३०हून अधिक सामने खेळणार आहेत. सामन्यांच्या संख्येचे दडपण सर्वच संघांवर असले तरी त्या दृष्टीने त्यांनी आधीपासून तयारी सुरू केली आहे.

प्रो कबड्डीच्या साखळीमध्ये प्रत्येक संघाच्या वाटय़ाला २२ सामने येणार आहेत. यापैकी घरच्या मैदानावर प्रत्येक संघाला सात दिवसांत सहा सामने खेळावे लागणार आहेत, तर अन्यत्र १५ सामने खेळावे लागतील. याशिवाय ६ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत जयपूरला होणाऱ्या आंतरविभागीय विशेष प्रवेशिकांच्या टप्प्यात प्रत्येक संघाला आणखी एक सामना खेळावा लागणार आहे.

मुंबई आणि चेन्नई येथे २२ ते २८ ऑक्टोबर या दरम्यान बाद फेरीचे सामने होणार आहेत. ‘अ’ आणि ‘ब’ गटातून प्रत्येकी तीन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. त्यामुळे या टप्प्यात किमान एक आणि कमाल चार सामने खेळावे लागणार आहेत. त्यामुळे सहा संघांच्या सामन्यांची संख्या ही सरासरी २३ ते २६ पर्यंत वाढणार आहे.

  • ‘सामन्यांमध्ये पुरेसे अंतर असल्यामुळे त्याचा फारसा त्रास होणार नाही. या दृष्टीने दुसरी सक्षम फळीसुद्धा आमची तयार आहे. वारंवार खेळाडू बदलत राहावे लागणार आहेत,’’ असे मत यू मुंबाचे प्रशिक्षक ई. भास्करन यांनी व्यक्त केले.

कबड्डीपटू सर्वसामान्यपणे वर्षभर खेळाशी जोडलेले असतातच. परंतु यंदाची स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक आहे. सामन्यांची संख्या बरीच आहे. घरच्या मैदानावर सात दिवसांत सहा सामने खेळावे लागणार आहेत, हेच सर्वात मोठे आव्हान असणार आहे. अन्य ठिकाणी मात्र पुरेशा प्रमाणात विश्रांती मिळणार आहे. तंदुरुस्ती हा कबड्डी खेळाचा आत्मा आहे. आमच्या संघात अनुभवी आणि गुणवान खेळाडूंचा विशेष भरणा आहे. सामन्यांची संख्या बरीच असल्यामुळे बंगाल संघाचे शिबीर आधीपासूनच सुरू केले. पहिल्या दोन आठवडय़ांच्या शिबिरात आम्ही तंदुरुस्तीवरच लक्ष केंद्रित केले. दुसरे शिबीर अद्याप सुरू असून, यात कौशल्यावर भर दिला जात आहे. संघरचना आणि दुसरी फळी कशी तयार करता येईल, हे यात प्राधान्याने लक्ष देण्यात आले. साहाय्यक प्रशिक्षकांची संपूर्ण फळी बदलण्यात आली आहे. जगदीश कुंबळेबंगाल वॉरियर्सचे प्रशिक्षक

सामन्यांची संख्या अधिक असल्यामुळे आम्ही सरावासाठी योग्य रणनीती वापरली आहे. तंदुरुस्ती आणि अन्य सराव यांच्यावरच खेळाडूंनी आता योजनापूर्वक लक्ष केंद्रित केले आहे. हंगाम मोठा असल्यामुळे स्वाभाविकपणे दुखापतीचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे असणार आहे. आमची दुसरी फळीसुद्धा अतिशय मजबूत आहे. या फळीतसुद्धा तितक्याच ताकदीचे खेळाडू आहे, ही संघाची जमेची बाजू ठरेल. त्यामुळे सामन्यांच्या संख्येनुसार खेळाडूंचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले जाईल. उदय कुमार, यूपी योद्धा प्रशिक्षक