News Flash

महिला कबड्डीच्या विकासात मैदानाचा खोडा!

महिला कबड्डीच्या प्रगतीपुढील अडसर

पुरुषांच्याच मैदानावर महिलांनी कबड्डी खेळवावी की महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धाचे संयोजन करावे, हा पेच सध्या आंतरराष्ट्रीय आणि भारतीय हौशी कबड्डी महासंघापुढे पडला आहे. त्यामुळे महिलांची विश्वचषक कबड्डी स्पर्धा आणि व्यावसायिक कबड्डी लीग लांबणीवर पडली आहे. मैदानाचे आकारमान हा मुद्दा महिला कबड्डीच्या प्रगतीपुढील प्रमुख अडसर ठरत आहे.

सध्या पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र आकाराची मैदाने वापरली जातात. आंतरराष्ट्रीय हौशी कबड्डी महासंघाच्या नियमानुसार हे आकारमान निश्चित करण्यात आले आहे. परंतु वेगवेगळ्या आकाराच्या मैदानांवर एकाच ठिकाणी स्पर्धा घेण्यास संघटना अनुकूल नाही. त्यामुळे भारतीय हौशी कबड्डी महासंघ महिलांनाही पुरुषांच्याच मैदानावर खेळवण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करीत आहे. अन्यथा महिलांचा विश्वचषक आणि महिलांची लीगसुद्धा स्वतंत्रपणे घेण्याचा दुसरा पर्याय त्यांच्यापुढे आहे. असे झाल्यास मैदानांच्या आकारामानातील बदलाच्या हालचाली टळू शकतील.

मागील वर्षी प्रो कबड्डीच्या चौथ्या पर्वात ‘महिला कबड्डी चॅलेंज’ नावाने तीन संघांमध्ये प्रायोगिक स्वरूपात महिलांचे सामने खेळवले गेले. या वेळी संयोजकांनी पुरुषांच्याच मैदानावर महिलांना खेळायला भाग पाडले होते. मोठय़ा आकारमानाच्या मैदानावर उंची आणि खेळ न उंचावल्याने महिलांची प्रायोगिक लीग अखेपर्यंत बहरलीच नाही. त्यामुळे महिला कबड्डीचा प्रयोग अपयशी ठरल्याचा शिक्का संघटकांनी त्यावर मारला.

यंदा पुरुषांच्या प्रो कबड्डी लीगने आपल्या कक्षा उंचावल्या आहेत. १२ संघांमध्ये तीन आठवडे ही लीग यंदा झाली. मात्र महिलांच्या लीगला यंदा प्रायोगिक स्वरूपातही स्थान देण्यात आले नव्हते. महिला कबड्डी लीगचा प्रयोग पुरुषांच्या मैदानावर त्यांना खेळवल्यामुळे फसला, हे मान्य करायला संघटनेतील पदाधिकारी अजिबात तयार नाहीत. उलटपक्षी हेच आकारमान महिलांसाठी कायम राबवण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे आहे.

२०१० आणि २०१४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेच्या व्यासपीठावर महिलांच्या स्पर्धा झाल्या. याचप्रमाणे पाटणा येथे २०१२ मध्ये पहिलीवहिली महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धा उत्तमपणे पार पडली. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजेच २०१६ मध्ये विश्वचषक स्पर्धा होणे अपेक्षित होते. पण या तारखेनंतर वर्ष उलटले तरी अद्याप महिला विश्वचषकाच्या कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धासुद्धा झाली, तीसुद्धा महिलांसाठीच्याच आकारमानाच्या मैदानावर झाली.

महिलांचा विश्वचषक आणि प्रो कबड्डी लीग याबाबत भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘आमच्याकडे तीन पर्याय आहेत. एक म्हणजे महिलांना सध्या अस्तित्वात असलेल्या पुरुषांच्या मैदानावर कबड्डी खेळवावे. हे थोडे अंगवळणी पडल्यानंतरच महिलांचा विश्वचषक आणि लीगविषयी विचार करता येईल. दुसरा मार्ग म्हणजे महिलांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या आकाराच्या मैदानावरच खेळवावे आणि तिसरा पर्याय म्हणजे पुरुष-महिलांना अनुकूल ठरेल असे मैदानाचे आकारमान निश्चित करणे. याबाबत योग्य भूमिका वर्षभरात घेण्यात येईल.’’

आव्हानात्मक मुद्दे

  • सध्या पुरुषांच्या कबड्डीसाठी ८५ किलोचे आणि महिलांच्या कबड्डीसाठी ७५ किलोचे बंधन भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघांनी घातले आहे. परंतु पुरुषांचे सरासरी वजन ८० ते ८५ असते आणि महिलांचे सरासरी वजन ६० ते ६५ असते. तसेच सरासरी उंचीचा विचार केल्यास पुरुषांची उंची ५.७ ते ६.३ इतकी असते, तर महिलांची ५ ते ५.६ असते. त्यामुळे शारीरिक घटकांचा विचार केल्यास पुरुषांचे वजन आणि उंची अधिक असते. त्यामुळे त्याच शास्त्रीय गुणधर्मानुसार आतापर्यंत मैदानांची रचना कार्यरत होती. त्यात बदल करणे अयोग्य ठरेल, असे मत अनेक महिला कबड्डीपटू आणि प्रशिक्षक यांनी मांडले आहे. त्यामुळेच क्रिकेट किंवा अन्य काही खेळांप्रमाणेच महिलांच्या मैदानाचे आकारमान थोडे छोटे करावे, अशी विनंती त्यांच्याकडून होत आहे.
  • २००२ च्या बुसान आशियाई क्रीडा स्पर्धेपासून कबड्डी अधिकृतपणे मॅट्सवर खेळवली जाऊ लागली. मात्र खुल्या मैदानावरील या कबड्डीला २००६च्या कतार आशियाई क्रीडा स्पर्धेपासून बंदिस्त क्रीडा संकुलाचे कोंदण लाभले. या प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर व्यावसायिक कबड्डीमध्ये मॅट्सचे वारे वाहू लागले. खेळ जसजसा मोठा होत गेला, तसतसे त्याचे थेट प्रक्षेपण आले. त्या अनुषंगाने क्रीडांगण, कॅमेरे, धावफलक, प्रकाशयोजना आदी अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरू लागल्या. सध्या पुरुषांच्या कबड्डी क्रीडांगणाची लांबी १३ मीटर आहे, तर महिलांच्या क्रीडांगणाची लांबी १२ मीटर आहे. मात्र पुरुषांच्या क्रीडांगणाची लांबी थोडी कमी आणि महिलांच्या क्रीडांगणाची लांबी थोडी वाढवून समतोल साधण्याचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. सध्या खेळत असलेले खेळाडू वर्षांनुवष्रे विशिष्ट क्रीडांगणाच्या आकारमानात खेळत असल्यामुळे त्यांना खेळताना सुरुवातीला काही प्रमाणात समस्या जाणवतील.

महिला आणि मुले प्रो कबड्डी आवडीने पाहतात, हे आम्हाला लक्षात आले आहे. त्यामुळे आम्ही विविध पर्यायांचा विचार करीत आहोत. मागील वर्षीच्या महिलांच्या प्रायोगिक लीगमधून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले.   – अनुपम गोस्वामी, प्रो कबड्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी

महिला कबड्डीपटूंचा सराव हा त्यांच्यासाठी असलेल्या आकारमानाच्या मैदानावर होत असतो. त्यामुळे त्यांना ती सवय झालेली असते. या पाश्र्वभूमीवर महिलांना पुरुषांच्या आकारमानाच्या क्रीडांगणावर खेळावे लागल्यास ते त्यांच्या प्रगतीसाठी बाधक ठरेल. पुरुषांचे क्रीडांगण मोठे असल्यामुळे खेळ एकाच बाजूला कुठे तरी खेळला जातो आहे, असे दिसून येईल. परंतु सर्वच स्पर्धासाठी नियमितपणे एकाच आकारमानाचे मैदान लागू केल्यास महिला खेळाडूंना ते अधिक उपयुक्त ठरेल. – माया आक्रे-मेहेर, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 2:32 am

Web Title: marathi articles on women kabaddi
Next Stories
1 भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बात्रा यांची निवड
2 भारतीय हॉकीची शानदार वाटचाल
3 क्रिकेटचा ‘पंच’नामा
Just Now!
X