भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली. चौथ्या सामन्यात गाबाच्या मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षांचा अबाधित गड सर केला. शुबमन गिल, ऋषभ पंत यांच्यासोबतच शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवत संघाला विजय मिळवून दिला. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेवर गेला होता. पण मराठमोळ्या अजिंक्यने भारतीय संघाची धुरा वाहिली. त्याच्यासोबत आणखी एका मराठमोळ्या खेळाडूने महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव जगात उंचावलं तो म्हणजे शार्दुल ठाकूर…

शार्दुलने भेदक मारा करत सामन्यात ७ बळी टिपले. पण त्याचसोबत आपल्या दुसऱ्याच कसोटी दमदार अर्धशतकही ठोकलं. डावाची सुरूवात आणि अर्धशतक दोन्ही गोष्टी त्याने षटकाराने साजऱ्या केल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताला विजय मिळवणं सोपं झालं. ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारतीय क्रिकेट संघ मायदेशात परतल्यानंतर गाबा कसोटी गाजवणारा शार्दूल ठाकूर आपल्या मूळ गावी पालघर माहीम येथे परतला.

पाहा व्हिडीओ-

तिथे पोहोचल्यावर शार्दुलच्या आईने औक्षण करून त्याचं घरात स्वागत केलं. माहीम गावानेही त्याचे जंगी स्वागत केले. माहीम परिसरात शार्दुलच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर ठिकठिकाणी अभिनंदनाचे फलक लावण्यात आले. तसेच विजयचा जल्लोष केक कापून करण्यात आला.