अर्धमॅरेथॉनमधील विजेत्या स्वाती गाढवेचा निर्धार
दोन बहिणी, लहान भाऊ आणि आई-वडील असा कुटुंबाचा गाडा शेतीवर अवलंबून.. त्यातूनही उत्पन्नाची हमी नाही, म्हणून वडील १५० रुपये रोजंदाजीवर मजुरी करतात.. या तुटपुंज्या पगारात घर-प्रपंच संभाळणे जिकिरीचे.. त्यात कर्जाचा डोंगर वाढलेला.. घरच्यांचा हा भार कमी करण्यासाठी महाराष्ट्राची धावपटू स्वाती गाढवे झटत आहे. रविवारी झालेल्या वसई-विरार महापौर स्पध्रेत स्वातीने अर्धमॅरेथॉनमध्ये जेतेपद पटकावले. २१ किलोमीटरचे अंतर तिने १ तास १८ मिनिटे ३५ सेकंदांत पूर्ण केले आणि कारकीर्दीतील सर्वोत्तम वेळही नोंदवली. महाराष्ट्राच्याच रोहिनी राऊत (१:१९:२४ से.) आणि मोनिका आथरे (१:२०:३६ से.) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.
या जेतेपदानंतर स्वाती म्हणाली, ‘‘जेतेपद पटकावल्याचा आनंद होत आहे. २०१२ मध्ये या स्पध्रेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे थोडी निराश होते. सातत्यपूर्ण कामगिरीचे हे फळ आहे.’’ पुणे जिल्ह्य़ातील हवेली तालुक्यामधील आळंदी म्हातोबाची या खेडय़ातल्या स्वातीने अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये आपली छाप उमटवली आहे.
‘‘आई-वडील शेती करतात, परंतु दुष्काळ, पाण्याची टंचाई यामुळे शेतीतून उत्पन्न मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे वडील १५० रुपये रोजंदारीवर काम करतात. मीही बक्षीस रकमेतून घरच्यांना हातभार लावते. नुकतेच मोठय़ा बहिणीचे लग्न केले. त्यासाठी घेतलेले कर्ज फेडायचे आहे. यंदा विविध स्पर्धामधून तीन लाख बक्षीस रक्कम जिंकली. त्यातून हा कर्जाचा भार किंचितसा हलका झाला आहे,’’ असे स्वातीने सांगितले.
पदार्पणात खेता रामचा स्पर्धा विक्रम
आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूट पुणे (एएसआय)चा अर्धमॅरेथॉन धावपटू खेता राम याने वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पध्रेत पूर्ण मॅरेथॉनमध्ये बाजी मारली. पहिल्यांदाच पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्या खेताने २ तास २२ मिनिटे ३२ सेकंदांत शर्यत पूर्ण करून गतवर्षीचा विजेता नीरज पाल (२:२२:३८ से.) याचा स्पर्धा विक्रम मोडला. एअर फोर्सच्या गिरीश तिवारीला (२:२८:०१ से.) आणि सुनील प्रसादला (२:२९:२० से.) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये एएसआयच्या मान सिंगने बाजी मारली. त्याने १ तास ६ मिनिटे व ३७ सेकंदांत २१ किमीचे अंतर पार केले. हैदराबाद आर्मीच्या श्रीनू बुगाथाने (१:०६:५४ से.) दुसरे आणि बंगळुरू आर्मीच्या बलिअप्पा एबीने (१:०७:०३ से.) तिसरे स्थान पटकावले.