मार्केलोच्या निर्णायक गोलच्या बळावर रिअल माद्रिदने मैत्रीपूर्ण लढतीत गलाटसराय संघावर २-१ असा विजय मिळवला. पहिल्या सत्रात नाचोने १७व्या मिनिटाला गोल करत रिअलला झटपट आघाडी मिळवून दिली. गलाटसराय संघाच्या बचावपटूंना सातत्याने चकवत रिअलच्या खेळाडूंनी चेंडूवर नियंत्रण ठेवले. मध्यंतरानंतर लगेचच वेस्ले स्नायजरने गलाटसरायतर्फे गोल करत बरोबरी केली. बरोबरीनंतर दोन्ही संघांनी गोलसाठी प्रयत्न केले. मात्र चांगल्या बचाव पद्धतीमुळे बरोबरीची कोंडी फुटू शकली नाही. निर्धारित वेळ संपायला आठ मिनिटे बाकी असताना मार्केलोने निर्णायक गोल करत रिअलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
रिअलने विजय मिळवला असला तरी गलाटसरायच्या तुलनेत बलाढय़ संघ असूनही त्यांना वर्चस्व गाजवता आले नाही. ल्युका मॉडरिकच्या कॉर्नरचा अचूक उपयोग करत नाचोने गोल केला. त्यानंतर थोडय़ाच वेळात इस्कोने उजव्या पायानिशी शैलीदार गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो गोलपोस्टच्या बाजूने गेला. रिअल माद्रिदचा महागडा खेळाडू गॅरेथ बॅलेने गोलसाठी सातत्याने प्रयत्न केले, मात्र त्याला गोलपोस्टची दिशा मिळू शकली नाही. वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कारविजेता ख्रिस्तियानो रोनाल्डोही फारशी चमक दाखवू शकला नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 20, 2015 4:41 am