पोलंडची गतविजेती इगा श्वीऑनटेकला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरी गटात सलग आठव्या वर्षी नवी विजेती पाहायला मिळणार आहे. ग्रीसची मारिया सकारी आणि चेक प्रजासत्ताकची बाबरेरा क्रेजिकोव्हा यांनी बुधवारी कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले.

महिला एकेरीच्या दिवसातील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात बिगरमानांकित क्रेजिकोव्हाने अमेरिकेच्या २४व्या मानांकित कोको गॉफला ७-६ (८-६), ६-३ असे पराभूत केले. २५ वर्षीय क्रेजिकोव्हाने वर्षांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत तिसरी फेरी गाठली होती. मात्र या वेळी तिने ग्रँडस्लॅम स्पर्धामधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. उगवती तारका गॉफ बुधवारी मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात अपयशी ठरली.

सकारीने अवघ्या एक तास आणि ३५ मिनिटांत श्वीऑनटेकला ६-४, ६-४ अशी धूळ चारली. श्वीऑनटेकच्या पराभवामुळे अव्वल १० मानांकनांमधील सर्व खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे.