गर्बिन मुगुरुझाचा दोन सेटमध्ये विजय; उपांत्य फेरीत सिमोना हॅलेपचे आव्हान

अनुभवापेक्षा काही वेळा तरुणापणातील चपळाईच अधिक उपयुक्त ठरते याचा प्रत्यय घडवत गर्बिन मुगुरुझाने फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेत मारिया शारापोव्हाचा दणदणीत पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठली. तिने हा सामना ६-२, ६-१ असा जिंकला.

मुगुरुझाने केवळ ६७ मिनिटांमध्ये ३१ वर्षीय शारापोव्हाचे आव्हान संपुष्टात आणले. शारापोव्हाने या स्पर्धेत २०१२ व २०१४ मध्ये अजिंक्यपद मिळवले होते. मुगुरुझाने २०१६ मध्ये येथे विजेतेपद जिंकले होते.  शारापोव्हापेक्षा सात वर्षांनी तरुण असण्याचा लाभ मुगुरुझाला मिळाला. तिने केलेल्या आक्रमक फोरहँड फटक्यांपुढे शारापोव्हाचा बचावात्मक खेळ मर्यादित ठरला. तसेच शारापोव्हाला सव्‍‌र्हिसवरही नियंत्रण ठेवता आले नाही.  मुगुरुझाने बिनतोड सव्‍‌र्हिसबरोबरच व्हॉलीजचाही कल्पकतेने उपयोग केला.

अग्रमानांकित सिमोना हॅलेपला मात्र अँजेलिक कर्बरविरुद्ध ६-७ (२-७), ६-३, ६-२ असा विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. हॅलेपने कर्बरविरुद्ध सुरुवातीला खूप खराब खेळ केला. पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्‍‌र्हिस गमावल्यामुळे ०-४ अशी ती पिछाडीवर होती. त्यानंतर तिने सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवले. हा सेट टायब्रेकपर्यंत गेला. कर्बरने परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच तिने नेटजवळून प्लेसिंग करीत टायब्रेकर घेत पहिला सेट मिळवला. दुसऱ्या सेटपासून हॅलेपला सूर गवसला. तिने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक करताना परतीचे अप्रतिम फटके मारले. हा सेट घेतल्यानंतर तिचा आत्मविश्वास वाढला. तिसऱ्या सेटमध्ये तिच्या चतुरस्र खेळापुढे कर्बरला फारशी संधी मिळाली नाही.

थिमपुढे सॅचिनाटोचे आव्हान

नोव्हाक जोकोव्हिचसारख्या जगज्जेत्या खेळाडूला रोमहर्षक लढतीत पराभूत केल्यानंतर माकरे सॅचिनाटोने अपेक्षा उंचावल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील उपांत्य फेरीत त्याला सातव्या मानांकित डॉमिनिक थिमचे आव्हान असणार आहे.

इटलीच्या सॅचिनाटोने या स्पर्धेतील मुख्य फेरीत कधीही विजय मिळवला नव्हता. यंदा मात्र त्याने उपांत्य फेरीत स्थान मिळवताना डेव्हिड गॉफीन, पाब्लो कॅरेन बुस्टा या मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. जोकोव्हिचविरुद्ध त्याने झुंजार खेळ करत विजय मिळवला.

सॅचिनाटोवर दोन वर्षांपूर्वी सामन्याचा निकाल निश्चित केल्याचा खटला दाखल करण्यात आला होता. मात्र त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. तो म्हणाला, ‘‘जोकोव्हिचवर मात करेन अशी मला खात्री नव्हती, मात्र पहिल्या सेटमध्ये माझा खेळ खूपच चांगला झाल्यानंतर आत्मविश्वास उंचावला. माझ्यासाठी हा संस्मरणीय विजय आहे. थिमविरुद्ध विजय मिळवणे सोपे नाही. त्याने अनेक बलाढय़ खेळाडूंना पराभूत केले आहे.’’