टेनिसमध्ये एकेकाळी अव्वल स्थानावर असणारी आणि ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद पाच वेळा जिंकणाऱ्या मारिया शारापोव्हाला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत वाइल्ड कार्ड एन्टी मिळाली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून ग्रँडस्लॅम स्पर्धेपासून दूर असलेली रशियन टेनिस सुंदरी पुन्हा एकदा मुख्य फेरीत प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देताना दिसणार आहे.

‘एपी’ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन टेनिस असोसिएशनने शारापोव्हाला थेट मुख्य फेरीत खेळण्यास हिरवा कंदील दिला. २०१६ मध्ये रंगलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर मारिया शारापोव्हाला यंदाच्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाली आहे.  उत्तेजकामुळे दीड वर्षे स्पर्धात्मक टेनिसपासून वंचित राहिलेल्या शारापोव्हाचे पुनरागमन यशस्वी ठरलेले नाही. केवळ तीनच स्पर्धानंतर रोममध्ये तिच्या स्नायूंना दुखापत झाली होती. परिणामी तिला विम्बल्डन स्पर्धेला मुकावे लागेल. शारापोव्हा टेनिसच्या मैदानात ताकदवान फटके खेळण्याची क्षमता असणारी खेळाडू म्हणून ओळखली जाते. त्यामुळे यावर्षीच्या अखेरच्या ग्रँडस्लॅममध्ये ती कशी कामगिरी करणार याकडे सर्व टेनिस चाहत्यांचे लक्ष असेल. अमेरिकेत रंगणाऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेपूर्वी शारापोव्हा अमेरिकेत रंगलेल्या स्टॅनफोर्ड क्लासिक टेनिस स्पर्धेत खेळली होती. अमेरिकेतील कोर्टवर खेळणे म्हणजे घरच्या मैदानावर खेळण्यासारखे असल्याचे ती मानते. त्यामुळे या स्पर्धेचा तिला कितपत फायदा होणार हे स्पर्धेच्या निकालानंतरच कळेल.

उत्तेजक द्रव्य सेवनात दोषी आढळल्यामुळे तिच्यावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता ती मैदानात कशी कामगिरी करणार याकडे टेनिस चाहत्यांचे लक्ष लागून आहे. २८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान या वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा रंगणार आहे. २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत उत्तेजक द्रव्य सेवनात दोषी आढळल्यामुळे तिच्यावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.