पंधरा महिन्यांच्या बंदीनंतर पहिलीच ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळणाऱ्या मारिया शारापोव्हाला अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेतील महिला गटाच्या दुसऱ्या फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानावर असलेल्या शारापोव्हाला ५९व्या स्थानावर असलेल्या हंगेरीच्या टिमेया बाबोसने कडवी झुंज दिली, तर पुरुष एकेरीत उदयोन्मुख खेळाडू अ‍ॅलेक्झांडर झाव्हरेव्ह आणि निक किर्गिओस यांना पराभव पत्करावा लागला.

पुनरागमनाच्या लढतीत दुसऱ्या मानांकित सिमोना हालेपला नमवून स्पर्धेत दणक्यात प्रारंभ करणाऱ्या शारापोव्हाला २ तास १९ मिनिटांच्या संघर्षांनंतर ६-७(४/७), ६-४, ६-१ असा विजय मिळवण्यात यश आले. ‘‘आजचा माझा खेळ सर्वोत्तम नक्कीच नव्हता. मात्र, काही वेळेला  अशा सामन्यांतूनही बरीच मजा येते आणि हा त्यापैकी एक सामना असे म्हणावे लागेल,’’ असे मत शारापोव्हाने व्यक्त केले.

रशियाच्या या ३० वर्षीय खेळाडूला पुढील फेरीत अमेरिकेच्या सोफिया केनीनचा सामना करावा लागणार आहे. ‘‘प्रत्येक दिवस ही नवीन संधी असते. अमेरिकन स्पध्रेतून मला पुनरागमन करण्याची संधी मिळाली हे विशेष आहे आणि भविष्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल,’’ असे २००६मध्ये अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणारी शारापोव्हा म्हणाली. महिला एकेरीच्या इतर लढतीत विम्बल्डन स्पध्रेतील विजेत्या गार्बिन मुगुरूझाने पहिल्यांदा अमेरिकन स्पध्रेची तिसरी फेरी गाठली. तिने चीनच्या डुयान यिंग-यिंगवर ६-४, ६-० असा विजय मिळवला.

पुरुष गटात चौथ्या मानांकित झाव्हारेव्हला गाशा गुंडाळावा लागला. यंदाच्या वर्षांत पाच एटीपी जेतेपद पटकावणाऱ्या झाव्हरेव्हला क्रोएशियाच्या बोर्ना कोरीककडून पराभव पत्करावा लागला. ६१व्या क्रमांकावर असलेल्या कोरीकने ३-६, ७-५, ७-६(७/१), ७-६(७/४) असा विजय मिळवला. ‘‘हा निकाल निराशाजनक आहे. या सामन्यात माझा विजय निश्चित समजला गेला होता, परंतु मला अपेक्षित खेळ करता आला नाही,’’ असे झाव्हरेव्ह म्हणाला. कोरीकला पुढील फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या केव्हीन अँडरसनचा सामना करावा लागणार आहे.

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या लढतीत मारिन सिलिकने ६-३, ६-३, ६-३ अशा फरकाने जर्मनीच्या फ्लोरीयन मेयरवर विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. १४व्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या किर्गिओसला सहकारी जॉन मिलमनकडून मात खावी लागली. मिलमनने ६-३, १-६, ६-४, ६-१ अशा फरकाने विजय मिळवला. ऑस्ट्रीयाच्या डॉमिनिक थिएमने ६-४, ६-१, ६-१ अशा फरकाने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डी मिनौरवर मात केली. कॅनडाच्या १८ वर्षीय डेनीस शापोव्हालोव्हने आठव्या मानांकित जो-विलफ्रिड त्सोंगावर विजय मिळवताना धक्कादायक निकाल नोंदवला. शापोव्हालोव्हाने २ तास ११ मिनिटांच्या खेळात त्सोंगावर ६-४, ६-४, ७-६(७/३) असा विजय मिळवला. तिसऱ्या फेरीत त्याच्यासमोर ब्रिटनच्या कायले एडमुंडचे आव्हान आहे.