दुखापतींमुळे महत्त्वाच्या खेळाडूंची माघार, मारिया शारापोव्हा आणि रॉजर फेडरर यांच्यासारख्या अग्रमानांकित खेळाडूंना दुसऱयाच फेरीत खावा लागलेला पराभवाचा फटका यामुळे विम्बल्डनमध्ये बुधवारचा दिवस सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा होता. आतापर्यंत सातवेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकणाऱया फेडररला युक्रेनच्या सर्जी स्टॅकोव्हस्की याने ६-७(५/७), ७-६(७/५), ७-५, ७-६(७/५) असा पराभव केला. राफेल नदालनंतर रॉजर फेडरर यालाही पराभवाममुळे विम्बल्डनमधून बाहेर पडावे लागल्यामुळे टेनिसप्रेमींना मोठा धक्का बसला.
मारिया शारापोव्हाला विम्बल्डन स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागला. जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या सौंदर्यवती शारापोव्हाला पात्रता फेरीचा अडथळा पार करुन मुख्य फेरीत दाखल झालेल्या पोर्तुगालच्या मिचेल लार्चर डि ब्रिटोने चीतपट केले. जागतिक क्रमवारीत १३१व्या स्थानी असलेल्या ब्रिटोने तृतीय मानांकित शारापोव्हाला ६-३, ६-४ असे सरळ सेट्समध्ये नमवले. निसरडय़ा कोर्ट्सवर शारापोव्हा अनेकदा घसरली. दुसऱ्या सेटदरम्यान तिने दुखापतग्रस्त पायावर उपचारही करुन घेतले. मात्र या वारंवार घसरणीचा स्पष्ट परिणाम शारापोव्हाच्या खेळावर झाला आणि तिने सामना गमावला.
विम्बल्डन नगरीत बुधवारचा दिवस गाजला तो विविध खेळाडूंच्या माघारीने. जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या व्हिक्टोरिया अझारेन्काने तसेच लाल मातीचा बादशाहला चीतपट करणाऱ्या स्टीव्ह डार्सिसने दुखापतीमुळे माघार घेतली. जॉन इस्नर आणि मारिन चिलीच यांनाही दुखापतीमुळे गाशा गुंडाळावा लागला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर माघारीमुळे कोर्टच्या निसरडय़ा स्वरुपाबाबत खेळाडूंनी शंका व्यक्त केली आहे.