पुरुष गटात माजी विजेत्या सिलिकचे आव्हान संपुष्टात

मारिया शारापोव्हाने अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेतील विजयी धडाका कायम राखताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. पुरुष गटात २०१४ साली विजेता ठरलेल्या मारिन सिलिकचे आव्हान संपुष्टात आले.

जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानावर असलेल्या शारापोव्हाने अमेरिकेच्या सोफिया केनीनवर ७-५, ६-२ असा सहज विजय मिळवला. २००६ मध्ये शारापोव्हाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. चौथ्या फेरीत शारापोव्हासमोर लॅटव्हियाच्या अनास्तासिजा सेव्हास्तोव्हाचे आव्हान असणार आहे.

क्रोएशियाच्या सिलिकला अर्जेटिनाच्या डिएगो श्वेर्टझमनकडून पराभव स्वीकारावा लागला. २९ व्या मानांकित श्वेर्टझमनने ४-६, ७-५, ७-५, ६-४ अशा फरकाने हा सामना जिंकला. जेतेपदाच्या शर्यतीत असलेला आणखी एका खेळाडूचे आव्हान संपुष्टात आले आहे. २३ व्या मानांकित जर्मनीच्या मिश्चा झाव्हरेव्हने ६-४, ६-३, ७-६(७/५) अशा फरकाने १०व्या मानांकित जॉन इस्नरचे आव्हान संपुष्टात आणले.

कॅनडाच्या डेनिस शापोव्हालोव्हनेही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. अमेरिकन स्पध्रेत १९८९ सालानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा तो युवा खेळाडू ठरला आहे. १८ वर्षीय शापोव्हालोव्ह ३-६, ६-३, ६-३, १-० असा आघाडीवर असताना प्रतिस्पर्धी ब्रिटनच्या कायले एडमुंडने दुखापतीमुळे माघार घेतली आणि शापाव्होलाव्हाचा मार्ग मोकळा झाला. शापोव्हालोव्हला पुढील फेरीत स्पेनच्या पॅब्लो सॅरोनो बुस्टाचे आव्हान पेलावे लागणार आहे. १२ व्या मानांकित बुस्टाने ६-३, ६-४, ६-३ अशा फरकाने फ्रान्सच्या निकोलस माहूटवर विजय मिळवला. इटलीच्या ३५ वर्षीय पाओलो लोरेंझीने सहकारी थॉमस फॅबीआनोचा ६-२, ६-४, ६-४ असा पराभव केला.

महिला गटातील जेतेपदाची प्रमुख दावेदार व्हीनस विल्यम्सनेही सहज विजय मिळवला. व्हीनसने ग्रिसच्या मारिया सक्कारीवर ६-३, ६-४ अशी मात केली. विम्बल्डन विजेत्या गार्बिन मुगुरूझालाही विजयासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. तिने स्लोव्हाकियाच्या मॅगडालेना रिबारिकोव्हावर ६-१, ६-१ अशी मात केली. १३व्या मानांकित पेट्रा क्वितोव्हाने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाला ६-०, ६-४ असे नमवून आगेकूच केली.

सानिया, बोपन्नाचे आव्हान संपुष्टात

भारताच्या लिएण्डर पेस आणि पुरव राजा या जोडीने पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदाच एकत्र खेळणाऱ्या या खेळाडूंनी सर्बियाच्या जांको टिप्सारेव्हीक आणि व्हिक्टर ट्रोइस्की यांच्यावर ६-१, ६-३ असा सहज विजय मिळवला. मात्र, दुसरीकडे भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांना पराभव पत्करावा लागला. दहाव्या मानांकित बोपण्णा आणि त्याचा उरुग्वेचा सहकारी पाब्लो कुएव्हास यांना ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेतील माजी विजेत्या फॅबियो फॉगनीनी आणि सिमोने बोलेल्ली या जोडीने एक तास ४७ मिनिटांच्या संघर्षांनंतर ७-५, ४-६, ४-६ असे नमवले. सानिया आणि तिचा क्रोएशियाचा सहकारी इव्हान डॉडीग यांना मिश्र दुहेरी गटात जेलेना ओस्टापेंको आणि फॅब्रिस मार्टीन या लॅटव्हीया व फ्रान्सच्या जोडीकडून ७-५, ३-६, ६-१० असा पराभव पत्करावा लागला.