News Flash

मेरी कोमचे सहाव्या सुवर्णपदकाचे लक्ष्य

नवी दिल्लीत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताची अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने ऐतिहासिक सहाव्या सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवले आहे.

मेरी कोमचे सहाव्या सुवर्णपदकाचे लक्ष्य
(संग्रहित छायाचित्र)

जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा आजपासून नवी दिल्लीत

कोसोवोच्या एकमेव बॉक्सरला व्हिसा देण्यात आलेल्या अडचणी आणि दिल्लीतील खराब प्रदूषण या पार्श्वभूमीवर जागतिक बॉक्सिंग स्पर्धा पहिल्यांदाच भारतात रंगणार आहे. नवी दिल्लीत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताची अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने ऐतिहासिक सहाव्या सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवले आहे.

बॉक्सिंग या खेळाच्या ऑलिम्पिकमधील सहभागावर अनिश्चिततेचे सावट असले तरी ७२ देशांमधील जवळपास ३०० पेक्षा अधिक महिला बॉक्सर्स विजेतेपदासाठी झुंज देतील. २००६ नंतर भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होत असून त्या वेळी भारताने ८ पदके (४ सुवर्ण, १ रौप्य, ३ कांस्य) पटकावली होती. सध्याच्या १० सदस्यीय भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश असला तरी २००६च्या कामगिरीची पुनरावृत्ती होणे शक्य नाही. यंदाच्या स्पर्धेत भारताला एक सुवर्णपदकासह तीन पदकांची अपेक्षा आहे.

३५ वर्षीय मेरी कोम हिच्यावर भारताच्या सर्वाधिक आशा आहेत. मेरी कोमने पाच जागतिक सुवर्णपदकांसह आर्यलडच्या केटी टेलर हिच्याशी बरोबरी साधली आहे. टेलर ही व्यावसायिक बॉक्सिंगकडे वळाल्याने सहावे सुवर्णपदक पटकावून जगातील सर्वात यशस्वी महिला बॉक्सर असा नावलौकिक मिळवण्याची संधी मेरी कोमला आहे. मेरी कोम ४८ किलो वजनी गटात सहभागी होणार असून घरच्या चाहत्यांसमोर ती दुसरे जागतिक सुवर्णपदक पटकावण्यासाठी सज्ज झाली आहे.

२०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागल्यामुळे सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास सोपा नाही, याची कल्पना तिला आहे. ‘‘२००१ पासून खेळणारे अनेक बॉक्सर्स माझ्या गटात आहेत. नवे आणि युवा बॉक्सर वेगवान, चपळ आणि दमदार आहेत.

मात्र मी माझ्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारण्याचा प्रयत्न करेन.  त्यामुळे माझ्यासाठी माझा अनुभव अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. तसेच देशवासियांचा पाठिंबादेखील मोलाचा ठरेल ’’ असे मेरी कोमने सांगितले. मेरी कोमची मणिपूरची सहकारी एल. सरिता देवी (६० किलो) हिच्याकडूनही भारताला पदकाची आशा आहे. त्याचबरोबर पिंकी जांगरा (५१ किलो), मनीषा मौन (५४ किलो), सोनिया (५७ किलो), सिमरनजीत कौर (६४ किलो), लवलिना बोर्गोहेन (६९ किलो), सविता बोरा (७५ किलो), भाग्यबती कचरी (८१ किलो) आणि सीमा पूनिया (८१ किलोवरील) या भारतीय बॉक्सर्स या १० दिवस चालणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 3:53 am

Web Title: marie coms aim sixth gold medal
Next Stories
1 शारीरिक साक्षरतेकडे दुर्लक्ष घातक -गोपीचंद
2 ‘रेयाल’च्या प्रशिक्षकपदी सोलारी
3 आता लक्ष्य उपांत्य फेरी!
Just Now!
X