जगातील सर्वात जुनी टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा विम्बल्डन येथे आज रविवारी नवीन इतिहास लिहिला जाणार आहे. क्रोएशियाची ४३ वर्षीय मारिया सिसक नोव्हाक जोकोव्हिच आणि माटिओ बेरेट्टिनी यांच्यातील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहणार आहे. १८७७ पासून विम्बल्डनच्या १४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात एखादी महिला पंच म्हणून कामगिरी करणार आहे.

सिसक ही गोल्ड बॅज चेअर पंच

मारिया सिसक ही गोल्ड बॅज चेअर पंच आहे. २०१२ पासून ती महिला टेनिस फेडरेशन (डब्ल्यूटीए) एलिट टीमची सदस्य आहे. टेनिसमधील सर्वाधिक श्रेणीतील पंचांना गोल्ड बॅज मिळतो. या आधी सिल्वर, ब्राँझ आणि ग्रीन बॅजेस आहेत.

सिसकने यापूर्वी अनेक महिला सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले होते. २०१४मध्ये तिने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पंचगिरी केली होती. तीन वर्षांनंतर, २०१७मध्ये तिने विम्बल्डन येथे झालेल्या महिला दुहेरी सामन्यातही काम पाहिले होते. याशिवाय २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमधील महिला एकेरीच्या सुवर्णपदकाच्या सामन्यातही सिसकने पंच म्हणून काम केले आहे.

 

 जोकरला मोठ्या विक्रमाची संधी

आज होणाऱ्या महामुकाबल्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचचा विजय झाला, तर तो सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकण्याच्या दृष्टीने रॉजर फेडरर आणि राफेल नदालची बरोबरी करेल. जोकोव्हिचने आतापर्यंत १९ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यामध्ये ५ विम्बल्डन विजेतेपदांचा समावेश आहे. फेडरर आणि नदाल यांनी प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. यावेळी नदाल विम्बल्डनमध्ये खेळला नाही. तर, उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर फेडरर स्पर्धेबाहेर पडला.