शेफील्ड (इंग्लंड) : स्नूकरपटू मार्क विल्यम्सने आपल्या कारकिर्दीतील याआधीचे विश्वविजेतेपद पटकावून तब्बल १५ वर्षांहून अधिक काळ लोटला होता. २०११ सालापासून तर त्याला स्नूकरच्या जागतिक क्रमवारीत स्थानदेखील मिळाले नव्हते. त्यामुळे यंदाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचा विचारदेखील त्याच्या मनाला शिवला नव्हता. त्यामुळेच तो स्पर्धेदरम्यान एकदा सहज म्हणाला की, जर दीड दशकानंतर विश्वविजेतेपद पटकावले तर विवस्त्र होऊन पत्रकार परिषदेला सामोरा जाईल. त्यानंतर अशी काही जादू झाली की पत्नीच्या आग्रहाखातर पुनरागमन करणारा मार्क केवळ अंतिम फेरीपर्यंतच पोहोचून थांबला नाही, तर त्याने चक्क विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. अन् त्याने स्वत:चा शब्द खरा करून दाखवला. पत्रकार परिषदेला विवस्त्र अवतरल्याने त्याच्या विश्वविजयापेक्षाही हीच चर्चा मोठी झाली.

मार्कने चार वेळा विश्वविजेत्या जॉन हिग्नीसला १८ -१६ असे पराभूत करून हे विश्वविजेतेपद पटकावले. ‘वेल्श पॉटिंग मशीन’ या टोपणनावाने स्नूकरविश्वात सुपरिचित असलेल्या मार्कच्या आयुष्याला २०१८ या वर्षांने पूर्ण कलाटणी दिली आहे. युनायटेड किंगडम विजेतेपद दोन वेळा तर अन्य २१ स्नूकर स्पर्धाचे विजेतेपद नावावर असलेल्या ब्रिटनच्या मार्कने १९९९ आणि २००३ साली असे दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावले होते.

मात्र त्यानंतर तो एकदाही विश्वविजेतेपदाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नव्हता. सात वर्षांपासून तर तो जागतिक क्रमवारीच्या यादीतदेखील नव्हता.

‘‘मी एखादी स्पर्धा जिंकू शकतो, असे मला कुणी वर्षभरापूर्वी सांगितले असते तरी मी ते हसण्यावारी नेले असते. मात्र माझ्या पत्नीने मला एकदा अखेरचा प्रयत्न म्हणून सर्वोत्तम प्रयास करण्याचा सल्ला दिला. आता माझ्या कामगिरीचे मलाच आश्चर्य वाटते आहे. यंदाच्या वर्षी दोन स्पर्धा जिंकल्यानंतर मला काहीसा आत्मविश्वास प्राप्त झाला. मात्र विश्वविजेतेपद पटकावण्याचा विचारदेखील मनाला शिवला नव्हता,’’ असे मार्कने पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला येताना तो कमरेला टॉवेल गुंडाळून आला. पण पत्रकारांसमोर खुर्चीवर बसताना मार्कने त्या टॉवेलचे बंधनदेखील दूर करीत सर्व प्रश्नांना ‘मोकळेपणाने’ उत्तरे दिली.

विश्वविजेतेपद जिंकणारा पहिला डावखुरा खेळाडू

मार्कने १९९९ साली जेव्हा स्नूकरचे विश्वविजेतेपद जिंकले, तेव्हा विश्वविजेता ठरलेला पहिला डावखुरा खेळाडू ठरला होता. मार्क हा ४३ वर्षांचा तर हिग्नीस हा ४२ वर्षांचा असून दोघांनी प्रदीर्घ काळापासून एकमेकांविरुद्ध सामने खेळले आहेत. या विजेतेपदासह मार्कने ५ लाख ७५ हजार डॉलरचे बक्षीस पटकावले आहे.

निवृत्तीची मानसिकता ते अव्वल स्थान

दशकाच्या प्रारंभापासून आलेल्या अपयशाने निराश झालेल्या मार्कने गतवर्षी खेळातून निवृत्ती पत्करण्याची तयारी केली होती. मात्र आपला निर्णय मागे घेत त्याने अशी अफलातून कामगिरी केली की तो आता विश्व क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.