खेळ कोणताही असो शेवटपर्यंत विजयाची आस सोडू नये असं म्हटलं जात. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या मार्श कप स्पर्धेत आज याचाच प्रत्यय आला. व्हिक्टोरिया विरुद्ध टास्मानिया या संघांमध्ये झालेल्या सामन्यात, व्हिक्टोरिया संघाने एका धावेने विजय मिळवला. ५० षटकांमध्ये व्हिक्टोरियाने टास्मानिया संघाला १८६ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना टास्मानियाचा संघ आपल्या लक्ष्याच्या अगदी जवळही आला होता. मात्र मोक्याच्या क्षणी टास्मानिया संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि व्हिक्टोरियाने एका धावाने सामन्यात बाजी मारली.

टास्मानिया संघाकडून सलामीवीर बेन मॅक्डरमॉर्टने आश्वासक सुरुवात केली. त्याचे सलामीच्या फळीतले साथीदार झटपट माघारी परतले तरीही मॅक्डरमॉर्टने व्हिक्टोरिया संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतकी खेळी केली. १०८ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने मॅक्डरमॉर्टने ७८ धावा केल्या. यानंतर मधल्या फळीत कर्णधार जॉर्डन सिल्क, जॉर्ज बेली आणि बेऊ वेब्स्टरने छोटेखानी खेळी करत टास्मानिया संघाचं आव्हान जिवंत ठेवलं.

३९ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर टास्मानियाचा पाचवा गडी माघारी परतला. यावेळी टास्मानियाची धावसंख्या ही १७२ झाली होती. मात्र ४० व्या षटकापासून व्हिक्टोरिया संघाच्या गोलंदाजांनी टास्मानियाची अखेरची फळी कापून काढली. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे अवघ्या ८ चेंडूत टास्मानियाचे ५ फलंदाज माघारी परतले आणि व्हिक्टोरियाच्या संघाने एका धावेने सामन्यात बाजी मारली. व्हिक्टोरिया संघाकडून ख्रिस ट्रेमेन आणि जॅक्सन कोलमॅन यांनी प्रत्येकी ४-४ तर विल सदरलँडने २ बळी घेतले.