क्रीडासंस्कृती व क्रीडा क्षेत्राविषयी जाणिवेचा अभाव यामुळेच भारताला रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये केवळ दोनच पदकांवर समाधान मानावे लागले, असे लंडन ऑलिम्पिक कांस्यविजेती बॉक्सिंगपटू एम. सी. मेरी कोमने सांगितले.

‘‘रिओ येथील ऑलिम्पिकसाठी मला केवळ दोनच पात्रता स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली, तर पुरुष खेळाडूंना पाच ते सहा स्पर्धामध्ये भाग घेता आला. असे असूनही भारताचे केवळ तीनच पुरुष खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. लवकरच राष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकरिता निवडणुका होत आहेत. या निवडणुकांनंतर देशातील बॉक्सिंग क्षेत्रात सकारात्मक चित्र पाहावयास मिळेल,’’ अशी अपेक्षा मेरीने व्यक्त केली.

मेरी कोमला येथील नॉर्थ ईस्टर्न हिल विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. मेरी कोम सध्या मणिपूरमधील उपेक्षित मुलामुलींना बॉक्सिंगचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे.

‘‘विद्यार्थ्यांनी अडचणींना आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे, तरच करिअरमध्ये यशाचे शिखर गाठता येते. विविध क्षेत्रांमध्ये उच्च कामगिरी करण्याची स्वप्ने तुम्हाला निश्चितपणे पडत असतील. मी तुम्हाला येथे प्रोत्साहन देण्यासाठीच आले आहे. मेहनतीला संयम, निष्ठा व जिद्दीची साथ दिली तर कोणतेही अशक्य ध्येय साकार करता येते,’’ असे मेरीने सांगितले.

 

एआयटीएवर ओझा व अय्यर यांची निवड

वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील संघटक भरत ओझा यांची अखिल भारतीय टेनिस असोसिएशनच्या (एआयटीए) उपाध्यक्षपदी, तर सुंदर अय्यर यांची कार्यकारिणीवर निवड झाली आहे. एआयटीएच्या मानद आजीव अध्यक्षपदी अनिल खन्ना यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली.

एआयटीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस संलग्न संघटनांपैकी २३ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेत २०१६-१८ या कालावधीसाठी निवडणूक घेण्यात आली. कार्यकारिणी समिती पुढीलप्रमाणे- मानद आजीव अध्यक्ष : अनिल खन्ना, उपाध्यक्ष : अनिल महाजन, भरत ओझा, चिंतन पारिख, सी.एस. सुंदर राजू, मेजर दलबीर सिंग, दीपेंदर हुडा, एम.ए. अलगप्पन, प्रवीणाबाई महाजन, राजन कश्यप, शत्रुघ्न सिन्हा. मानद सरचिटणीस : हिरोन्मय चटर्जी, मानद सहसचिव : सुमन कपूर, अनिल धुपर, खजिनदार : रक्तीम सैकिया. कार्यकारिणी सदस्य : ए.बी. प्रसाद, विक्रमसिंग सिसोदिया, अशोक कुमार, असित त्रिपाठी, सी.बी.एन. रेड्डी, मूर्ती गुप्ता, दिनेश अरोरा, टी.डी. फ्रान्सिस, सुंदर अय्यर, सी.पी. काकेर, सुभाष मारिया, नूरउद्दीन माथूर.