लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या एम.सी. मेरी कोमला आगामी रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान देण्याची विनती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने फेटाळली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) आणि बॉकसग इंडियाच्या अस्थायी समितीने तिला विशेष प्रवेशिकेद्वारे रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्याची विनंती केली होती.
मेरी कोमला पात्रता स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला होता. ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पदक मिळवण्याची क्षमता तिच्याकडे असल्यामुळेच तिच्याकरिता विशेष प्रवेशिका मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते.
‘‘मेरी कोम ही केवळ भारतीय खेळाडूंसाठी नव्हे तर अनेक परदेशी खेळाडूंसाठीही प्रेरणास्थान आहे. तिला पात्रता स्पर्धेत निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळेच तिला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडे (एआयबीए) ही विनंती केली आहे,’’ असे आयओएचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी म्हटले होते. पण त्याला यश आले नाही.