प्रतिकूल परिस्थितीतही बॉक्सिंगचा ध्यास जपत आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवास्पद प्रदर्शन करणारी भारताची अव्वल महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमने रिओ ऑलिम्पिकनंतर निवृत होण्याचे संकेत दिले आहेत. ‘‘निवृत्तीबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र रिओ ऑलिम्पिकनंतर मी निवृत्त होऊ शकते. सराव अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यावरच माझा भर आहे. देशासाठी जास्तीतजास्त पदके पटकावण्यासाठी सर्वोत्तम सराव होणे गरजेचे आहे,’’ असे मेरीने सांगितले. रिओ ऑलिम्पिकच्या तयारीविषयी विचारले असता मेरी म्हणाली, ‘‘यंदाच्या वर्षांत कोणतीही मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाही. त्यामुळे काही निमंत्रितांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणार आहे. अशा सामन्यांमुळे मोठय़ा स्पर्धाची तयारी होऊ शकते, तंदुरुस्तीचा अंदाज येतो.’’ ती पुढे म्हणाली, ‘‘पूर्वाचलातील राज्यांमध्ये अनेक गुणवान खेळाडू आहेत. मात्र त्यांच्या कामगिरीत अजून सुधारणेची आवश्यकता आहे, जेणेकरून ते देशासाठी पदके जिंकू शकतील.’’