बसुमतरी, बोगरेहेनला, संजीव, मनीषलाही सुवर्णपदक

भारताची अव्वल महिला बॉक्सिंग खेळाडू एम. सी. मेरी कोम, विलाओ बसुमतरी, लोवलिना बोगरेहेनने इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. याचप्रमाणे एल. सरिता देवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांमध्ये संजीतने सुवर्ण कामगिरी केली. त्याचा प्रतिस्पर्धी जागतिक पदकविजेत्या शिवा थापाने माघार घेत रौप्यपदकावर समाधान मानले.

महिला गटात ऑलिम्पिक आणि जागतिक पदकविजेती मेरी कोमने ४८ किलो गटाच्या अंतिम फेरीमध्ये फिलिपिन्सच्या जोसी गॅबुकोवर ४-१ असा सहज मिळवला. यंदाच्या स्पर्धेत पहिले सुवर्ण पटकावण्याचा मान विलाओ बसुमतरीने पटकावला. तिने ६४ किलो गटामध्ये थायलंडच्या सुदापोर्न सिसोन्दीवर चुरशीच्या लढतीमध्ये ३-२ अशी मात केली. यापूर्वी, २०१५ मध्ये तिने सर्बियामध्ये झालेल्या नेशन्स चषक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.

आसामच्याच लोवलिना बोगरेहेनने वेल्टरवेट (६९ किलो) गटामध्ये वर्चस्व राखले. तिने भारताच्याच पूजाचा पराभव केला. मेरी कोमसह विलाओ बसुमतरी, लोवलिना बोगरेहेनने पहिले स्थान मिळवले तरी एल. सरिता देवीला (६० किलो) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला अंतिम फेरीमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती फिनलंडच्या मिरा पॉट्केनॉनकडून २-३ असा पराभवाचा धक्का बसला.

पुरुषांमध्ये संजीतने उझबेकिस्तानच्या सन्जर तुर्सुनोवला हरवत ९१ किलो गटाचे जेतेपद पटकावले. राष्ट्रीय विजेता मनीष कौशिकने बॉक्सिंग रिंगमध्ये न उतरता बाजी मारली. ६० किलो गटाच्या अंतिम फेरीमध्ये त्याचा प्रतिस्पर्धी आणि अव्वल बॉक्सर शिवा थापाने माघार घेतली.

आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेता सतीश कुमारलाही (९१ किलोवरील) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत त्याचा उझबेकिस्तानच्या जालोलोवकडून १-४ असा पराभव झाला. दिनेश डगरचीही (६९ किलो) मजलही रौप्यपदकापर्यंत गेली. त्याला उझबेकिस्तानच्या बोबो-उस्माने बटुरोवने हरवले.  सतीश यादवला (९१ किलो) रौप्यपदक मिळाले.