देशात सध्या पाचशे आणि हजारच्या नोटबंदीच्या निर्णयावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. बँक आणि एटीएमसमोर दिसणाऱ्या लांब रांगा, दोन हजार रुपयाच्या नोटेवरील रंग उडाल्याची चर्चा यामुळे सरकारच्या निर्णयावर काही प्रमाणात विरोध देखील केला जात आहे.  तर दुसरीकडे देशातील भ्रष्टाचारावर उपचार म्हणून मोदींच्या  निर्णयाचे अनेक क्षेत्रातून स्वागत देखील केले जात आहे.

सामान्य जनता, बॉलिवूड आणि खेळाच्या मैदानात मोदींच्या निर्णयाला बळ दिले जात असताना आणखी एका लोकप्रिय खेळाडूने मोदींना पाठिंबा दिला आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी महिला बॉक्सर मेरीकोमने नोटबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले. देशातील भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मेरीकोमने म्हटले. या निर्णयानंतर जनतेला काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, मात्र ५०० आणि १००० रुपयाच्या नोटाबंदीमुळे कमी पैशात जगण्याचा वेगळा अनुभव देणारा क्षण असल्याचे मत मेरी कोमने व्यक्त केले.

८ नोव्हेबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर आपल्या कष्टाच्या पैशाला पुन्हा मुल्यप्राप्त करुन देण्यासाठी नागरिकांनी बँका आणि डाक कार्यालयातील लांबच्या लांब रांगाचे चित्र अद्यापही कायम आहे. मेरी कोमने २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते.