महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचा थरार आजपासून

उलान उदे (रशिया)

सहा वेळा जगज्जेती ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिच्या अनुभवाचा पुन्हा एकदा कस लागणार असून गुरुवारपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पदकाची भिस्त तिच्यावरच असणार आहे. मेरी कोमसह अनेक युवा बॉक्सर आपले नशीब अजमावणार आहेत.

मणिपूरची ३६ वर्षीय मेरी कोम ही फक्त देशासाठीच नव्हे तर जागतिक बॉक्सिंगचेही प्रेरणास्थान बनली आहे. सहा वेळा जागतिक सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर आता रशियाच्या भूमीतही नव्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी ती सज्ज झाली आहे. मेरी कोमची सहकारी आणि माजी विजेती एल. सरिता देवी (६० किलो) हिने निवड चाचणी स्पर्धेत गेल्या जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सिमरनजित कौरला हरवल्यामुळे तिच्याकडूनही पदकाच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.

जागतिक स्पर्धेत यंदा भारताच्या पाच बॉक्सर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. इंडिया खुल्या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती नीरज (५७ किलो) आणि जमुना बोरो (५४ किलो) जगातील अव्वल खेळाडूंशी दोन हात करण्यासाठी उत्सुक आहेत. ७५ किलो गटात, माजी आशियाई विजेती साविती बूरा हिच्या कामगिरीकडेही सर्वाचे लक्ष असेल.

४८ किलो वजनी गटात मेरी कोमऐवजी यावेळी मंजू राणी लढत असल्यामुळे तिच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मंजूने अलीकडे दमदार कामगिरी करत आपली छाप पाडली होती. जागतिक स्पर्धेत भारताने २००६मध्ये सर्वोत्तम कामगिरी सादर करत मेरी कोम आणि सरिताच्या सुवर्णासह आठ पदकांची कमाई केली होती.

भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समतोल साधण्यात आला आहे. गेल्या वेळी नवी दिल्लीत झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताने चार पदकांची कमाई केली होती. आता युवा खेळाडू कशी कामगिरी करतात, यावर भारताचे भवितव्य अवलंबून राहील. इटलीमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगला सराव केला आहे.

– मोहम्मद अली कमार, राष्ट्रीय प्रशिक्षक

भारतीय महिला बॉक्सिंग संघ : मंजू राणी (४८ किलो), एम. सी. मेरी कोम (५१ किलो), जमुना बोरो (५४ किलो), नीरज (५७ किलो), एल. सरिता देवी (६० किलो), मंजू बोम्बोरिया (६४ किलो), लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो), साविती बूरा (७५ किलो), नंदिनी (८१ किलो), कविता चहल (८१ किलोवरील)