बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मश्रफी मोर्ताझाला करोना विषाणूची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मश्रफीची तब्येत ठीक नव्हती, यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने करोनाची चाचणी करुन घेतली. मश्रफीच्या चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आल्यानंतर त्याने स्वतःला क्वारंटाइन करुन घेतलं आहे. यामुळे मश्रफी बांगलादेशमधला पहिला करोनाग्रस्त खेळाडू ठरला आहे.

आणखी वाचा- सौरव गांगुलीच्या परिवारातील व्यक्तींना करोनाची लागण

२०१८ साली मश्रफी मोर्ताझाने क्रिकेटसोबतच राजकारणाच्या मैदानातही पाऊल ठेवलं होतं. नाराली मतदारसंघातून मश्रफी खासदार म्हणून निवडून आला आहे. बांगलादेशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून तो सतत आपल्या मतदारसंघात लोकांच्या मदतीसाठी जात होता. आपला अहवाल पॉजिटीव्ह आल्यानंतर मोर्ताझाने स्वतःला आपल्या ढाका येथील घरात क्वारंटाइन केलं आहे. बांगलादेशात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ लाखांपर्यंत पोहचली असून १४०० लोकांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेश क्रिकेट संघातील सर्वात अनुभवी खेळाडू अशी ओळख असलेल्या मश्रफीने ३६ कसोटी, २२० वन-डे आणि ५४ टी-२० सामन्यांमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.