मध्य आशियामधील लेबनान देशाची राजधानी असणाऱ्या बैरूट शहरामध्ये मंगळावारी संध्याकाळच्या सुमारास दोन मोठे स्फोट झाले. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरलं. या स्फोटांमध्ये ७० जण ठार तर ४००० जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच स्फोटाची व्यापकता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटांचा आवाज संपूर्ण शहरात घुमला आणि त्याचे हादरेही बसले. या महाभयंकर स्फोटांमुळे एकच हलकल्लोळ उडाला. हे स्फोट नेमके कशामुळे झाले हे समजू शकलेलं नाही. देशाचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून या घटनेवर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग यानेदेखील या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. “बैरूटमध्ये झालेल्या स्फोटाची दृश्य चित्त विचलीत करणारी आहे. स्फोटानंतर तेथील स्थानिक नागरिकांची अवस्था काय झाली असेल याचा विचारही करता येऊ शकत नाही. या घटनेत ज्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. २०२० हे वर्ष खरंच साऱ्यांना आपले गुडघे टेकायला भाग पाडतं आहे”, असे युवराजने ट्विट करत म्हटले.

दरम्यान, बैरुटमधील हे दोन महाभयंकर स्फोट १५ मिनिटांच्या फरकाने झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की संपूर्ण शहरातल्या घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरलं. शहरांमधल्या अनेक रस्त्यांवर धुराचे लोट पाहण्यास मिळाले. पण बैरुटमधल्या भारतीय दुतावासाने भारतीयांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. कुणीही घाबरुन जाऊ नये, जर कुणाला मदत हवी असेल तर हेल्पलाइन नंबरही देण्यात आले आहेत.