यंदाच्या आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी चेन्नईमध्ये पार पडला. यावेळी लिलावात दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने तब्बल 16 कोटी 25 लाख रुपये मोजले. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलवरही मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या बंगळुरुने त्याला 14.25 कोटींची बोली लावून खरेदी केलं. पण, यावेळी लिलावात इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघातील सलामीवीर फलंदाज जेसन रॉयवर कोणत्याच संघाने लावली नाही. एकाही संघाने खरेदी न केल्यामुळे रॉय निराश झाला असून त्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

जेसन रॉय दिल्ली कॅपिटल संघाचा सदस्य होता. पण गेल्या हंगामात त्याने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. तर, यावेळी लिलावापूर्वी त्याला दिल्ली संघाने रिलीज केले होते. पण, शुक्रवारी झालेल्या लिलावात एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. त्यामुळे निराश झालेल्या जेसन रॉयने यंदा आयपीएलचा भाग नसणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

“यंदा आयपीएलचा भाग नसणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, पण ज्यांची निवड झाली त्यांचं…विशेषतः ज्यांच्यावर जास्त बोली लागली त्याचं मी अभिनंदन करतो…आयपीएल बघायला मजा येईल”, अशा आशयाचं ट्विट जेसन रॉयने केलं आहे.


दरम्यान, यंदाच्या आयपीएल लिलावात आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने तब्बल 16 कोटी 25 लाख रुपये मोजले. मॉरिसने युवराज सिंगचा विक्रम मोडला. यापूर्वी युवराजला 16 कोटींना खरेदी केले गेले होते.