राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘फिट इंडिया’ अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानात ‘फिट इंडिया’ अभियानाचा कार्यक्रम झाला. यावेळी मोदी यांनी ‘फिट इंडिया’सारख्या अभियानाची जगातील प्रत्येक राष्ट्राला गरज असल्याचे सांगितले. तसेच या अभियानात सामील होऊन अभियानाला पाठिंबा देण्याचे आवाहन मोदी यांनी केले. त्या आवाहनानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने खास व्हिडीओ ट्विट करून या अभियानाला पाठिंबा दर्शवला आहे.

सचिनने ट्विटरवर एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. सचिनने नुकतीच सेंट अँथनी वृद्धाश्रमाला भेट दिली. तेथील हा व्हिडीओ आहे. या भेटीदरम्यान त्याने त्या वृद्धाश्रमातील महिलांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत छान वेळ घालवला आणि त्यांच्यासोबत कॅरम खेळण्याचा आनंद लुटला. याशिवाय सचिनने त्या वृद्ध महिलांना अधाराचा हात देत त्यांच्या समस्यादेखील जाणून घेतल्या. ट्विट केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याने पंतप्रधान मोदी यांच्या फिट इंडिया अभियानाला पाठिंबादेखील दिला.

दरम्यान, आज आपल्या देशाला महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद मिळाले होते. त्यांनी आपल्या खेळातून जगाला मोहिनी घातली होती. असे सांगत मोदी शारीरिक सुदृढतेवर भर देण्याचा सल्ला दिला. काही वर्षांपूर्वी सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात सहज हालचाली होत होत्या. तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर आपल्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. व्यायाम आपल्या जगण्याचे अंग आहे. शरीर सुदृढ राहिले, तर चांगलं आरोग्य लाभेल आणि खेळाचा थेट संबंध सुदृढतेशी आहे. त्यामुळे क्रीडाप्रकार खेळा आणि सुदृढ रहा, असे मोदी यांनी या औचित्याने भारतीयांना सांगितले.