तुषार वैती

२४ मार्च २०१८ हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासामधील काळा दिवस. ऑस्ट्रेलियाच्या लखलखत्या इतिहासाला वादाची काळी किनार लावणारा मुख्य सूत्रधार डेव्हिड वॉर्नरच्या कर्तृत्वामुळे समस्त ऑस्ट्रेलियावासीयांची मान शरमेने खाली गेली. एका खरखरीत कागदाने कॅमेरून बॅनक्रॉफ्टला चेंडू घासायला वॉर्नरने भाग पाडले आणि तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार वॉर्नर यांच्यासह ऑस्ट्रेलियन क्रिकेटला उतरती कळा लागली. एका वर्षांच्या बंदीवासानंतर आपण पुन्हा पुनरागमन करू शकणार नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे विचार वॉर्नरच्या मनात घोळत होते.

चेंडू फेरफार प्रकरणानंतर वॉर्नर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात परतला, तेव्हा सिडनी विमानतळावर तो ढसाढसा रडला. मनातून पूर्णपणे खचला होता. पत्नी कँडिस आणि दोन मुलांच्या नजरेतून उतरला होता. ऑस्ट्रेलियन जनतेच्या, चाहत्यांच्या प्रश्नांना, टोमण्यांना सामोरे जाण्याची त्याची हिंमत नव्हती. पण पत्नी वॉर्नरच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. वॉर्नरने जे कृत्य केले आहे, ते समर्थनीय नसले तरी त्यात पूर्ण दोष माझा आहे, असे सांगत कँडिसने संपूर्ण आळ आपल्यावर घेतला.

संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी खर्ची घालवल्यानंतर त्याच्या आयुष्यातून क्रिकेटच हद्दपार झाले होते. आपल्यासमोर पुढे काय वाढून ठेवले आहे, याची पुसटशी कल्पना वॉर्नरला आली होती. आता काय करावे, हेच त्याला काही आठवडे सुचत नव्हते. पण खेळाडू असलेल्या कँडिसने त्याला धीर दिला. सकाळी झोपेतून उठवून ती वॉर्नरला धावायला घेऊन जाऊ लागली. पण चाहत्यांच्या टीका-टोमण्यांचा भडिमार त्यांच्यावर होऊ लागला. ते खचले नाहीत. कँडिसने त्याला हे टोमणे पचवण्याचे बळ दिले. हळूहळू चाहत्यांचा विरोध मावळत गेला. वॉर्नरचा आक्रमक स्वभाव आणि अहंकार गळून पडला होता. स्थानिक स्पर्धामध्ये खेळण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने आपली तंदुरुस्ती राखण्यावरही भर दिला.

एका वर्षांनंतर वॉर्नर दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाला. पण बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळायला गेल्यानंतर वॉर्नरला दुखापतीमुळे स्पर्धा अर्धवट सोडावी लागली. नशीब साथ देत नव्हते. पण तो हरला नव्हता. पुन्हा जोमाने पुनरागमन करण्याचा चंग त्याने मनाशी बाळगला होता. आपले दुसरे घर असलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघात तो दाखल झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघातील स्थानाविषयी त्याला काहीही देणेघेणे नव्हते. फक्त चाहत्यांच्या हृदयातून गमावलेली जागा परत मिळवण्याचे आव्हान त्याच्यासमोर होते. सुरुवातीला त्याची बॅटही तळपत नव्हती. पण नंतर निराशा झटकून तो पेटून उठला. १२ सामन्यांत एक शतक आणि आठ अर्धशतकांसह ६९२ धावा फटकावून तो ‘ऑरेंज कॅप’ पुरस्कारासह राष्ट्रसेवेसाठी मायदेशी परतला.

दरम्यानच्या काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेटची वाताहत झाली. प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रशासनामध्येही बदल झाले. कोणत्याही स्थितीत जिंकण्याच्या वृत्तीमुळे खेळाडूंकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा ठपका प्रशासनावर ठेवण्यात आला. त्यानंतर स्मिथचे ऑस्ट्रेलिया संघात खुल्या मनाने स्वागत केले जाईल, अशी खेळाडूंमध्ये कुजबूज होती. पण वॉर्नरच्या पुनरागमनाविषयी कुणीही बोलण्यास तयार नव्हते. वॉर्नरविषयी सहकाऱ्यांनीही असहकार पुकारला होता. आरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा सलामीची जबाबदारी नेटाने पार पाडत असल्यामुळे वॉर्नरच्या समावेशाविषयी प्रश्नचिन्ह होतेच. पण विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडे वॉर्नरशिवाय कोणताही पर्याय नव्हता. वॉर्नरच्या संवादातील बदलाने संघातील सर्वाची मने जिंकून घेतली. वर्षभराच्या बंदीनंतर त्याची धावांची भूक अधिकच वाढली होती.

खडतर परिस्थितीवर मात करत आंतरराष्ट्रीय क्षितिजावर आपले अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. सरावादरम्यान वेगवान आणि अव्वल फिरकी गोलंदाजांचा सामना करताना तो इतरांपेक्षा अधिक परिश्रम घेत होता. यंदाच्या विश्वचषकातील ८९*, ३, ५६, १०७, २६ आणि १६६ धावांची कामगिरी वॉर्नरने घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. ३२ वर्षीय वॉर्नर आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ बनला आहे.

वॉर्नरच्या आक्रमक स्वभावाची जागा शांत, संयमी आणि समतोल क्रिकेटपटूने घेतली. शतकी खेळी उभारल्यानंतरही त्याच्या जल्लोषात पूर्वीइतका जोश दिसत नाही. चाहत्यांना स्वाक्षरी देतानाही अहंकार आड येत नाही. केपटाऊन कसोटीतील ‘त्या’ प्रकाराने डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. प्रत्येक वेळी एक वेगळाच वॉर्नर मैदानावर दिसत आहे. जणू नव्या वॉर्नरचा उदय झाला आहे.