भारतीय क्रिकेटमधील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी सामना निश्चितीसंदर्भात कायदा हवा आणि सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता द्यावी, अशा सूचना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अजित सिंह शेखावत यांनी मंगळवारी दिल्या.

एप्रिल २०१८मध्ये ‘बीसीसीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी शेखावत हे राजस्थानच्या पोलीस दलात महासंचालकपदावर कार्यरत होते. गेल्या वर्षभरात १२ क्रिकेटपटूंशी भ्रष्टाचाराच्या उद्देशाने संपर्क साधला गेल्याची प्रकरणे प्रकाशात आल्यानंतर शेखावत यांनी या सूचना केल्या आहेत. तमिळनाडू प्रीमियर लीगमधील संशयास्पद घटना आणि महिला क्रिकेटपटूशी सट्टेबाजाचा संपर्क ही दोन ताजी प्रकरणे उजेडात आली आहेत.

मुंबई, कर्नाटक आणि तमिळनाडू यांच्या लीगमधील काही वादग्रस्त घटनांमुळे सामना किंवा निकाल निश्चिती रोखणे देशात आव्हानात्मक आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना शेखावत म्हणाले, ‘‘रोखणे कठीण मुळीच नाह़ी. सामना निश्चितीसंदर्भात कायद्याची देशात नितांत आवश्यकता आहे. याबाबत स्पष्ट कायदा अस्तित्वात आल्यास पोलीससुद्धा योग्य कारवाई करू शकतील.’’

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडप्रमाणे सामना निश्चिती हा फौजदारी गुन्हा व्हावा, असे मत भारतीय विधि आयोगाने गेल्या वर्षी व्यक्त केले होते. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सट्टेबाजीला अधिकृत करावे. त्यामुळे सरकारला चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल. कारण क्रीडा प्रकारांवरील सट्टेबाजीची उलाढाल मोठी आहे, असे शेखावत यांनी नमूद केले.