युवा क्रिकेटपटूंना साक्षर करण्याची राहुल द्रविडची मागणी
एखादा कठोर कायदाच खेळाडूंना सट्टेबाजांपासून दूर राहण्यापासून परावृत्त करू शकतो. त्यामुळे सामनानिश्चिती किंवा स्पॉट-फिक्सिंगला फौजदारी गुन्हा करा, अशी मागणी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने केली आहे.
सामनानिश्चिती किंवा स्पॉट-फिक्सिंगसारखे प्रकार रोखण्यासाठी काय करता येईल, याबाबत द्रविडने आपले परखड मत मांडले. तो म्हणाला, ‘‘फिक्सिंगसारख्या अनधिकृत प्रकारांना मुळापासून उपटण्यासाठी हे प्रकार फौजदारी गुन्ह्य़ात मोडायला हवेत. त्याचबरोबर युवा क्रिकेटपटूंना प्राथमिक स्तरावरच सामनानिश्चितीबाबत साक्षर करायला हवे. माझ्या मते, युवा क्रिकेटपटूंना प्राथमिक स्तरावर फिक्सिंगबाबतचे ज्ञान तसेच त्यांचे समुपदेशन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. देशात युवा क्रिकेटपटूंना सामनानिश्चितीबाबतचे योग्य ज्ञान देण्यास लवकरात लवकर सुरुवात करायला हवी. यापूर्वीच असा प्रयत्न झालेला आहे. बीसीसीआयचे स्वत:चे भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षापथक असल्यामुळे रणजी संघातील खेळाडूंना याबाबतचे ज्ञान देण्यात आले आहे. तरीही असे प्रकार घडत असल्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा अमलात आणण्याची गरज आहे. फक्त शिक्षणाने काहीही होणार नाही, त्यासाठी कठोर कायदाच हवा. निदान कठोर कायद्याच्या भीतीने तरी खेळाडू फिक्सिंगसारख्या प्रकारांपासून दूर राहतील.’’
सायकलिंगमधील उत्तेजक प्रकरणाचा संदर्भ देताना द्रविड म्हणाला, ‘‘उत्तेजकांचे सेवन करणे हे चुकीचे आहे, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. त्याबाबतची अनेक प्रकरणे वाचून भीती वाटते. तरीही सायकलपटू उत्तेजकांचे सेवन करतात. ते उत्तेजक चाचणीला घाबरत नाहीत वा सायकलिंग महासंघाला. त्यांना फक्त पोलिसांची आणि तुरुंगात जाण्याची भीती वाटते. त्यामुळेच खेळामधील अनैतिक प्रकार रोखण्यासाठी कडक कायदे करण्याची गरज आहे.’’
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघातील एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या तीन क्रिकेटपटूंना स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. ‘‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी कोणतेही भाष्य करणार नाही. पण एखाद्याने चुकीचे कृत्य केले असेल अथवा नाही, त्यांच्यावरील आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याची संधी द्यायला हवी, असे मला वाटते.
पोलिसांनी स्पॉट-फिक्सिंगचे प्रकरण उजेडात आणले. त्यामुळे क्रिकेट प्रशासकांनीही खेळाच्या भल्याकरिता पोलिसांना सहकार्य करायला हवे. पोलिसांकडे अधिकार असल्यामुळे तेच असे प्रकार उजेडात आणू शकतात,’’ असेही द्रविडने सांगितले.