मेलबर्नमधली सोमवारची प्रसन्न सकाळ.. ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा अर्थात वर्षांतल्या पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचा सलामीचा दिवस.. १२८ लढती खेळवल्या जाणार असल्याने संयोजकांची लगबग उडालेली.. आपल्या लाडक्या टेनिसपटूंना ‘याचि देहा, याचि डोळा’ पाहण्यासाठी रॉड लेव्हर एरिना प्रांगणात चाहत्यांचे जथे जमण्यास सुरुवात झालेली.. आणि याच सुमारास टीव्हीवर आणि ऑनलाइन विश्वात एक बातमी सादर झाली. ‘बीबीसी आणि बझफीड’ या वृत्तसेवांनी टेनिसमधील सामनानिश्चिती प्रकरणाचा गौप्यस्फोट केला. पत्रकारितेची तत्त्वे जपणाऱ्या मोजक्या आस्थापनांमध्ये बीबीसीची गणना होते, तर अभ्यासपूर्ण गौप्यस्फोटांसाठी व्हच्र्युल विश्वात बझफीड प्रसिद्ध आहे. त्या वृत्ताने खळबळ उडाली. मेलबर्नमध्ये एका आगंतुक ढगाने आसमंत व्यापला आणि अस्वस्थ करणारे मळभ दाटले. टेनिस कोर्टवरचे मळभ तासाभरात दूर झाले, पण समस्त टेनिसविश्वावरची काजळी जराही कमी झालेली नाही.

या प्रकरणाचे मूळ २००७ च्या घटनांमध्ये आहे. पोलंडमधील स्पर्धेत निकोलय डेव्हडेन्को आणि मार्टिन व्हॅसेलो यांच्यातील लढतीत सट्टेबाजांनी निकालनिश्चितीचा प्रयोग केला असल्याचे स्पष्ट झाले. त्या वेळी रशियातल्या सट्टेबाजांकडे संशयाची सुई होती. पुरुषांच्या टेनिसचे नियंत्रण करणाऱ्या असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) संघटनेने स्वतंत्र खासगी यंत्रणेकडे तपास सोपवला. ही लढत हिमनगाचे केवळ एक टोक असल्याचे तपासकर्त्यांना स्पष्ट झाले. सट्टेबाजांचा विळखा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अव्वल खेळाडूंपर्यंत आहे, यामध्ये ग्रँड स्लॅम विजेत्यांचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले. मात्र बातमीतली खळबळजनकता पुढेच होती. या प्रकरणात दोषी सिद्ध झालेल्या खेळाडूंना कोणतीही शिक्षा झालेली नाही. खेळाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या टेनिसपटूंना साधी समजही देण्यात आली नाही किंवा दंडही ठोठावण्यात आला नाही. हे मोकाटवीर सहजपणे खेळत आहेत आणि त्यातले काही ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचा भाग आहेत, हे कळल्याने गहजब झाला. गैरप्रकार होतोय समजल्यावर तपास करून दोषीही सापडले. पण इतक्या वर्षांत कोणालाही शिक्षाच न झाल्याचे उघड झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले.

सट्टा लावणे बहुसंख्य देशांमध्ये वैध आहे. खेळ पाहतानाच्या मनोरंजनाचा तो एक भाग समजला जातो. एटीएमसारखी बेटिंग किऑस्क मशिन्स असंख्य स्पर्धाच्या परिसरात असतात. आणि यामध्ये बेकायदेशीर वगैरे काहीही नाही. प्रत्यक्षात कोणत्या सामन्यांचा निकाल सट्टेबाजांनी फिरवला आहे, कोणाला हरण्यासाठी पैसे मिळाले आहेत, हे शोधून काढणे कठीण आहे. गंमत, मनोरंजनासाठी चालणारा सट्टा आणि रीतसर सामन्यांचे निकाल फिरवणारे ‘रॅकेट्स’ यामधला फरक धूसर आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे एका क्षणात जगाच्या दुसऱ्या टोकात होणाऱ्या सामन्याचा तपशील समजू शकतो. सांघिक खेळांच्या तुलनेत टेनिस सट्टेबाजांसाठी सोपा खेळ आहे. खेळाडू एकटाच असल्याने फार वाटाघाटींचा प्रश्न उद्भवत नाही. धनादेश, खात्यात पैसे जमा होणे, यामध्ये नोंद होण्याचा मुद्दा असल्याने खेळाडूंना रोख पैसे दिले जातात. हे रोखण्यासाठी एटीपीतर्फे टेनिस इंटिग्रिटी युनिटची स्थापना करण्यात आली आहे. मात्र एटीपी तसेच आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन) यांची कृती मात्र सट्टेबाजीला पूरक ठरते. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धाचे तात्काळ निकाल उपलब्ध व्हावेत यासाठी स्पोर्ट्स रडार कंपनीने आयटीएफशी ७ कोटी डॉलर्सचा करार केला. हे निकाल बुकी आणि सट्टेबाजांना उपयुक्त ठरतात़, हे ठाऊक असूनही हा करार झाला. डेव्हिस आणि फेड चषक या प्रतिष्ठेच्या स्पर्धाचे प्रायोजकत्व आयटीएफने बेटवे या ऑनलाइन सट्टेबाजी संकेतस्थळाला दिले आहेत. शिखर संघटनांवरचा हा आर्थिक दबावच सट्टेबाजीला आवतण देत आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत सामन्यांचे निकाल दर्शवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक गुणफलकाचे सहप्रायोजकत्व विल्यम हिल या प्रसिद्ध ऑनलाइन बेटिंग कंपनीला देण्यात आले आहे. एकीकडे सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्यांना खुलेआम प्रायोजकत्व मिळत असताना दुसरीकडे खेळाडूंना या कंपन्यांचे वैैयक्तिक प्रायोजकत्व घेण्यापासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टेनिस हा खर्चीक खेळ आहे. २०१३ मध्ये आयटीएफ संघटनेनेच एक सर्वेक्षण केले. स्पर्धाच्या बक्षीस रकमेतून मिळणाऱ्या मानधनाने १० टक्के खर्चही भागत नसल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या १४,००० टेनिसपटूंच्या उत्तरातून स्पष्ट झाले. साहजिकच प्रायोजक टेनिसपटूंसाठी मुख्य त्राता आहेत. अव्वल स्तरावरच्या खेळाडूंना प्रायोजित करण्यासाठी बहुतांशी ब्रँड उत्सुक असतात. मात्र दुय्यम आणि तृतीय स्तरातल्या खेळाडूंसाठी हा प्रश्न गंभीर बनतो आणि नेमकी हीच गोष्ट सट्टेबाज हेरतात. चॅलेंजर अर्थात टेनिसविश्वातल्या सगळ्यात निम्नतम स्पर्धामध्येच सर्वाधिक गैरप्रकार होत असल्याचे सिद्ध झाले आहे. हे रोखण्यासाठी उपाययोजना आहेत, पण अर्थकारणामुळे शिखर संघटनांचे हात बांधले गेले आहेत. पैसा मती भ्रष्ट करतो असे म्हणतात. सामनानिश्चिती हे त्याचे दुर्दैवी उदाहरण आहे. कष्टाला परतावा मिळणे अत्यावश्यक आहे. पैसा सन्मार्गाने कमवायचा की खेळभावनेला बट्टा लावत हरण्यासाठी लाचार व्हायचे हे खेळाडूंनी ठरवायचे आहे. क्रिकेट, अ‍ॅथलेटिक्स, फुटबॉल या खेळांमध्ये फोफावलेले गैरप्रकार रोखण्यात संघटना सपशेल अपयशी ठरल्या आहेत. त्यांच्या रांगेत यायचे नसेल तर टेनिस संघटनांना जागे होऊन काम करावे लागेल.

parag.phatak@expressindia.com