पाकिस्तानचा प्रतिभावान फलंदाज उमर अकमल याच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मॅच फिक्सिंगप्रकरणी तीन वर्षांची बंदी घातली. ते प्रकरण शांत होईपर्यंत भारताचा दुसरा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेच्या तीन खेळाडूंचे नाव मॅच फिक्सिंग प्रकरणात जोडले गेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सध्या मॅच फिक्सिंग प्रकरणाच्या तपासाअंतर्गत तीन श्रीलंकन ​​क्रिकेटपटूंची चौकशी केली आहे, अशी माहिती श्रीलंकेचे क्रीडा मंत्री दुल्लास अलाहापेरुमा यांनी बुधवारी दिली. हे तीन खेळाडू माजी खेळाडू आहेत की विद्यमान खेळाडू आहेत, याची त्यांनी माहिती दिलेली नाही. मात्र हे तीन खेळाडू सध्याच्या संघातील नाहीत असे श्रीलंका क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले.

क्रिकेट हा सज्जन लोकांचा खेळ (gentleman’s game) आहे. पण अशा खेळामध्ये पैशापुढे शिस्त व चारित्र्य कमी पडल्याचे पाहून आम्हाला खूप वाईट वाटत आहे, असे अलाहापेरुमा म्हणाले. तर, “माननीय मंत्री महोदयांनी आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटद्वारा सुरू केलेल्या तपासाविषयी जो उल्लेख केला, त्यातील तीन खेळाडू हे माजी क्रिकेटपटू आहेत. श्रीलंकेच्या विद्यमान संघातील नाहीत असा आम्हाला विश्वास आहे”, असे मंडळाच्या निवेदनात म्हटले आहे.

ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी निलंबित झालेल्या वेगवान गोलंदाज शेहान मधुशंकाबाबत बोलताना अलाहापेरुमा म्हणाले, “ही बाब खूपच खेदजनक आहे. क्रिकेट चाहत्यांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्याने अपेक्षाभंग केला.” मधुशंकाला गेल्या आठवड्यात श्रीलंका पोलिसांनी हेरॉईन बाळगल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर श्रीलंका क्रिकेटने त्याच्याशी असलेला आपला करार रद्द केला.