इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

चिन्नास्वामी स्टेडियमवर आज आव्हान संपुष्टात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुशी सामना

कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ऐवजी स्टीव्ह स्मिथला नेतृत्व सोपवण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सला चांगलाच फळला. त्यामुळे मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना खेळणारा स्मिथ राजस्थानला आणखी एक विजय मिळवून देणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राजस्थानला आव्हान संपुष्टात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा सामना करायचा आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत स्मिथकडे राजस्थानचे नेतृत्व सोपवण्यात आले. तेव्हापासून चारपैकी तीन सामने जिंकून राजस्थानने बाद फेरीच्या शर्यतीत स्वत:चे आव्हान कायम राखले आहे. धडाकेबाज फलंदाज जोस बटलर, अष्टपैलू बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर विश्वचषकाच्या तयारीसाठी इंग्लंडला परतल्यामुळे राजस्थानला संघर्ष करावा लागेल, असे वाटत होते.

मात्र १७ वर्षीय रियान पराग, लिआम लिव्हिंगस्टोन यांनी फलंदाजीत, तर वरुण आरोन व ओशेन थॉमस यांनी गोलंदाजीत बहुमूल्य योगदान दिल्यामुळे राजस्थानने हैदराबादविरुद्ध सहज विजय मिळवला. त्यामुळे तूर्तास १२ सामन्यांतून १० गुणांसह सातव्या स्थानावर असणाऱ्या राजस्थानला उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवण्याबरोबरच अव्वल चार क्रमांकावर असलेल्या संघांनी त्यांचे सामने गमावण्याची आवश्यकता आहे. फिरकीपटू श्रेयस गोपाळवर राजस्थानच्या फिरकीची धुरा असून स्मिथला विजयी निरोप देण्यासाठी राजस्थानचे खेळाडू सर्वस्व पणाला लावतील, यात शंका नाही.

दुसरीकडे रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे विराट कोहलीच्या बेंगळूरुला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. १२ सामन्यांतून चार विजय आणि आठ पराभवांसह गुणतालिकेच्या तळाशी असणाऱ्या बेंगळूरुला आता प्रतिष्ठेसाठी खेळावे लागणार आहे. कोहलीव्यतिरिक्त एबी डी’व्हिलियर्स, शिम्रॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस अशा एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाजांचा समावेश असूनही बेंगळूरुने यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा निराशा केली.

गोलंदाजांच्या अपयशाचा फटका त्यांना अधिक महागात पडला. यजुर्वेद्र चहल व नवदीप सैनी वगळता कोणीही कामगिरीत सातत्य राखू शकले नाही. त्यातच डेल स्टेन दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांना मुकणार असल्याने त्यांच्या समस्येत आणखी भर पडली. राजस्थानचा फिरकीपटू श्रेयसपासून बेंगळूरुच्या  फलंदाजांना सावध राहावे लागणार आहे. त्याने गतवेळेस कोहलीला विशेषत: हैराण केले होते. त्यामुळे श्रेयस विरुद्ध कोहली यांच्यातील झुंज पाहण्यास चाहत्यांना मजा येईल.

संघ

राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अ‍ॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशेन थॉमस, लिआम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेसन मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरो, आर्यमन बिर्ला, रियान पराग,मनन वोरा, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग,  राहुल त्रिपाठी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), मार्कस स्टोइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज, हेन्रिच क्लासीन (यष्टीरक्षक), मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोम, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत खेजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १