ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणी

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या एमसी मेरी कोमशी सामना करण्याची निखात झरीनची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. वुहान (चीन) येथे होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीसाठी ५१ किलो वजनी गटात निखातपुढे मेरीसह तिघींचे आव्हान आहे.

तेलंगणाच्या निखातची पहिली लढत रेल्वेच्या ज्योती गुलियाशी होईल, तर सहा वेळा विश्वविजेत्या मेरीचा सामना हरयाणाच्या रितू ग्रेवालशी होईल. जर निखात आणि मेरीने आपल्या लढती जिंकल्या, तरच दोघींमध्ये अंतिम पात्रता झुंज होईल. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर २७ आणि २८ डिसेंबरला होणाऱ्या या निवड चाचणी लढतीमधील विजेती खेळाडू ५१ किलो गटातून ३ ते १४ फेब्रुवारी, २०२०ला वुहानला होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळेल.

निवड समितीच्या बैठकीत मेरीला प्रथम, निखातला द्वितीय, ज्योतीला तृतीय आणि रितूला चतुर्थ स्थान देण्यात आले. भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या नियमानुसार, पहिल्याची चौथ्याशी आणि दुसऱ्याची तिसऱ्याशी लढत होईल.

ऑलिम्पिक पात्रतेसाठी निवड चाचणी लढती खेळवाव्यात. या लढतींचे थेट प्रक्षेपणसुद्धा करण्यात यावे, असे आवाहन निखात गेले काही महिने राष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाला करीत आहे. बिग बाऊट लीगमध्ये मेरी आणि निखात यांच्यात लढत होण्याची शक्यता होती. परंतु पाठीच्या दुखापतीमुळे मेरीने अखेरच्या क्षणी माघार घेतल्यामुळे ही लढत होऊ शकली नाही.

६० किलो वजनी गटात माजी विश्वविजेत्या एल. सरिता देवीपुढे शाशी चोप्रा, सिमरनजीत कौर आणि पवित्राचे आव्हान असेल, ६९ किलो गटात दोन वेळा विश्व अजिंक्यपद कांस्यपदक विजेत्या लव्हलिना बोर्गोहेनला अंजली, ललिता आणि मीना राणीचे अडथळे पार करावे लागतील. ७५ किलो गटात आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या पूजा राणीसह इंद्रजा केए, स्वीटी बुरा आणि नूपुर यांचा समावेश आहे.

पुरुष  विभाग

५७ किलो : कविंदर सिंग बिश्त, गौरव सोलंकी, मोहम्मद हसमुदीन, सचिन; ६९ किलो : विकास कृष्णन, नवीन बोरा, दुर्योधन सिंग, आशिष; ७५ किलो : आशिष कुमार, अंकित खटाना; ८१ किलो : ब्रिजेश यादव, सचिन कुमार, सुमित सांगवान; ९१ किलो : नमन तन्वर, नवीन, गौरव चौहान; ९१+ किलो : सतीश कुमार, नरेंदर.