भारताचा आघाडीचा फलंदाज मयंक अग्रवाल दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. मयंक नेटमध्ये सराव करत असताना त्याच्या हेल्मेटला चेंडू आदळला. त्यामुळे त्याला दुखापत झाली आहे. त्याची दुखापत गंभीर नसली तर त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने तपासणी केल्यानंतर पहिल्या कसोटीत वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मयंक पहिल्या कसोटीला मुकल्याने आता आघाडीला केएल राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे.

नेटमध्ये राव करताना मोहम्मद सिराजच्या आखुड टप्प्याच्या गोलंदाजीवर फटका चुकला आणि चेंडू हेल्मेटवर आदळला. मागच्या बाजूला चेंडू लागल्याने दुखापत झाली. हेल्मेट काढल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर फिजिओ नितिन पटेल यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला.

भारतीय संघातील आघाडीचा फलंदाज शुभमन गिल, अष्टपैलू खेळाडू वॉशिंगटन सुंदर आणि वेगवान गोलंदाच दुखापतीमुळे यापूर्वीच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेला मुकले आहेत. या तीन खेळाडूंच्या जागी बीसीसीआयने पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना पाठवलं आहे. हे दोन्ही खेळाडू श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात होते. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज मैदानात खेळला जाणार आहे.

भारत- इंग्लंड कसोटी सामन्याचं वेळापत्रक

  • पहिला कसोटी सामना ४ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट ( ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम)
  • दुसरा कसोटी सामना १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट ( लॉर्ड मैदान, लंडन)
  • तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट (लीड्स)
  • चौथा कसोटी सामना २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर (ओव्हल मैदान, लंडन)
  • पाचवा कसोटी सामना १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर (ओल्ड ट्रॅफोर्ड, मॅचेस्टर)

भारतीय संघ- रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, सूर्यकुमार यादव (अजून सामील होणे बाकी आहे), पृथ्वी शॉ (अजून सामील होणे बाकी आहे)

राखीव खेळाडू- प्रसिध कृष्णा, अरझन नागवासवाला