टोक्यो : सहा विश्वविजेतेपदे जिंकणारी भारताची सर्वाधिक अनुभवी बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम हिला टोक्यो ऑलिम्पिकमधून रिक्त हस्ते परतावे लागणार आहे. महिलांच्या ५१ किलो वजनी गटातील उपउपांत्यपूर्व फेरीत कडवी झुंज देऊनही मेरीला पराभव पत्करावा लागला.

कोलंबियाच्या इंग्रिट व्हॅलेन्सियाने मेरीवर ३-२ अशी मात केली. त्यामुळे लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या ३८ वर्षीय मेरीचे ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. मुख्य म्हणजे पहिली फेरी गमावल्यानंतर मेरीने उर्वरित दोन फेऱ्यांमध्ये उत्तम कामगिरी केली; परंतु एकूण निकालाचा कौल तिच्याविरोधात गेला. मेरीला बॉक्सिंगमध्ये पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र तिच्या पराभवामुळे तमाम भारतीय बॉक्सिंगप्रेमींचा हिरमोड झाला.

पराभूत झाल्यानंतरही मेरीने कोणत्याही प्रकारची निराशा न दाखवता खुल्या मनाने व्हॅलेन्सियाला आलिंगन दिले. त्याशिवाय कारकीर्दीतील अखेरचा ऑलिम्पिक सामना खेळल्याचे संकेत देत तिने चारही दिशेने हात उंचावून अभिवादन केले. त्यामुळे जगभरातील क्रीडा चाहत्यांकडून मेरीवर कौतुकाचा वर्षावही करण्यात येत आहे.

मेरीच्या पराभवानंतर महिलांच्या विभागात आता पूजा राणी, लव्हलिना बोर्गोहेन आणि सिमरनजीत कौर यांच्यावर भारताच्या आशा टिकून आहेत. यांपैकी पूजा आणि लव्हलिना यांनी उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले असून सिमरनजीत शुक्रवारी उपउपांत्यपूर्व लढतीसाठी रिंगणात उतरणार आहे.

अविश्वसनीय पराभव!

खराब पंचगिरीबद्दल मेरीचे बॉक्सिंग कृती दलावर ताशेरे

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकच्या उपउपांत्यपूर्व फेरीमधील पराभव अविश्वसनीय असल्याचे मत बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोमने व्यक्त केले. याचप्रमाणे खराब पंचगिरीबद्दल मेरीने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) बॉक्सिंग कृती दलावर टीका केली.

प्रशासकीय आणि आर्थिक गैरव्यवहारांमुळे ‘आयओसी’ आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेला निलंबित केल्यामुळे टोक्योमधील ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी कृती दलावर सोपवण्यात आली आहे. ‘‘मला हा निर्णय समजलाच नाही. कृती दलाबाबत नेमके काय चुकीचे घडले आहे,’’ असा सवाल मेरीने सामन्यानंतर उपस्थित केला. ‘‘मीसुद्धा कृती दलाची सदस्य आहे. स्पर्धा व्यवस्थित पार पडावी, या उद्देशाने मी त्यांना सूचना आणि पाठबळ देत असते. परंतु तरीही ते माझ्याशी असे का वागले,’’ असा प्रश्न मेरीने विचारला. ‘‘सामना संपल्यानंतर मी आनंदाने रिंगण सोडले. कारण मी जिंकल्याचे मला वाटत होते. मला उत्तेजक चाचणीसाठी त्यांनी नेले, तेव्हासुद्धा मी शांत होते. समाजमाध्यमांवर आणि माझे प्रशिक्षक छोटेलाल यादव यांच्याकडून मी पराभूत झाल्याचे मला समजले. मी याआधी दोनदा व्हॅलेन्सियाला नमवले होते. त्यामुळे पंचांनी विजयी म्हणून तिचा हात उंचावला, यावर माझा विश्वासच बसेना,’’ असे मेरीने सांगितले. ‘‘या निर्णयाविरुद्ध आढावा घेता येत नव्हता आणि निषेधही नोंदवता येत नव्हता. परंतु जगाने हे सर्व नक्की पाहिले आहे, याची मला खात्री आहे. मी दुसरी फेरी निर्विवादपणे जिंकले, मग अंतिम निकाल ३-२ असा माझ्या विरोधात कसा काय जाऊ शकतो. जे घडले, ते पूर्णत: अनपेक्षित होते,’’ असे मेरीने सांगितले.

‘‘भारतात गेल्यावर मी काही काळ विश्रांती घेईन. कुटुंबीयांसमवेत वेळ घालवेन. परंतु निवृत्ती पत्करणार नाही. यापुढील स्पर्धांमध्येही मी सहभागी होत राहीन आणि माझे नशीब आजमावेन,’’ असे मेरी यावेळी म्हणाले.