इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्याही परिस्थितीत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आयपीएल प्रशासकीय समितीच्या सर्वच्या सर्व १४ अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी वानखेडेचे दरवाजे कोलकाता नाइट रायडर्सचा सहमालक शाहरूख खानसाठी खुले होणार आहेत.
गेल्या शनिवारी आयपीएल प्रशासकीय समितीने आयपीएलचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडेवरून बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हलवण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) विरुद्ध एमसीए यांच्यात जोरदार ‘पत्र’युद्ध पेटले होते. परंतु मुंबईकरांना वानखेडेवर अंतिम सामन्याचा आनंद घेता यावा, यासाठी एमसीएने या ‘अटी’तटीच्या युद्धात एक पाऊल मागे घेतले आहे. आता अंतिम सामन्यासाठी मुंबई किंवा बंगळुरू यांच्यापैकी कोणत्या स्थानाची आयपीएल प्रशासकीय समिती शुक्रवारी निवड करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
‘‘आम्हाला आयपीएलचे प्रमुख रणजिब बिस्वाल यांच्याकडून १३ मे रोजी मिळालेल्या पत्रात १४ अटींचा समावेश आहे. अंतिम सामना मुंबईत व्हावा, यासाठी एमसीएचे अध्यक्ष शरद पवारसुद्धा आग्रही होते. एमसीए कार्यकारी समितीच्या गुरुवारी झालेल्या तातडीच्या बैठकीमध्ये या सर्व अटी मान्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या निर्णयाचा आदर राखून आयपीएल प्रशासन अंतिम सामना वानखेडेवर खेळवण्यास तयार होईल,’’ अशी अपेक्षा एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी केली.
सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांचे नाव न घेता त्यांच्या सहकार्याचा सावंत यांनी या वेळी आवर्जून उल्लेख केला. ‘‘आयपीएल प्रशासकीय समितीमध्ये मुंबईच्या खेळाडूंचाही समावेश आहे. त्यांनीसुद्धा या अभियानात आम्हाला पाठबळ दिले,’’ असे सावंत यांनी पुढे सांगितले.
मुंबईच्या वानखेडेवर आयपीएलचा अंतिम सामना व्हावा, याकरिता एमसीएने खालील अटींची पूर्तता करावी. अशा आशयाचे पत्र आयपीएलचे प्रमुख रणजिब बिस्वाल यांनी एमसीएला मंगळवारी सायंकाळी पाठवले होते. या पत्रामध्ये अंतिम सामन्याकरिता सर्व संघांचे मालक आणि अधिकारी यांना वानखेडेवर प्रवेशास परवानगी असावी, असे नमूद करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी शाहरूखने सामना संपल्यानंतर मैदानावर हुल्लडबाजी केली होती. त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एमसीएने शाहरूखवर एमसीएच्या परिसरात प्रवेश करण्यास पाच वर्षांची बंदी घातली होती. तथापि, कोलकाताचा सहमालक शाहरूखला फक्त आयपीएलच्या अंतिम सामन्यापुरती वानखेडेवर प्रवेशास संमती असेल, असे सावंत यांनी या वेळी स्पष्ट केले. याविषयी सावंत म्हणाले, ‘‘बिस्वाल यांच्या पत्रात फक्त अंतिम सामन्यासाठी सर्व अटी नमूद करण्यात आल्या आहेत.’’
बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सुनील गावस्कर म्हणाले की, ‘‘अंतिम सामन्याविषयी आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही. आम्ही एमसीएच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत. त्यानंतर आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेण्यात येईल.’’
अंतिम सामना मुंबईहून बंगळुरूला हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत जाब विचारणारे पत्र आयपीएल प्रशासकीय समितीला लिहिले होते. त्यानंतर अंतिम सामन्यासाठी १४ अटींची पूर्तता करावी, अशा आशयाचे पत्रोत्तर आयपीएल प्रशासकीय समितीने एमसीएला पाठवले होते.
आयपीएल संयोजकांना ८५ टक्के पार्किंगची जागा उपलब्ध करावी, रात्री १०नंतर फटाके आणि संगीत वाजवण्यास परवानगी असावी, प्रेक्षागृहातील आणखी खास जागा उपलब्ध करण्यात याव्यात, अशा अटींचा यात समावेश करण्यात आला होता.