महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने आता (एमसीए) मदतीचा हात पुढे केला आहे. गुरुवारी झालेल्या एमसीएच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘‘शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री दुष्काळ साहाय्य निधीसाठी करण्याचे निश्चित करण्यात आले,’’ अशी माहिती एमसीएचे उपाध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी दिली.
खेळाडूंच्या वर्तणुकीसंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी शिस्तपालन समिती नेमण्यात आली असून, यावर दोन उपाध्यक्ष आणि गणेश अय्यर यांचा समावेश आहे. याचप्रमाणे डिसेंबरमध्ये होणाऱ्या मुंबई प्रीमियर लीगसाठी वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखाली
समिती नेमण्यात आली आहे. या समितीवर पदाधिकारी आणि अय्यर यांचा समावेश आहे.