भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे पश्चिम विभागाचे प्रमुख क्युरेटर असलेल्या सुधीर नाईक यांची मुंबईच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यापूर्वी वानखेडेचे क्युरेटर म्हणून त्यांना जगभरातील क्रिकेट क्षेत्रातील मंडळींनी नावाजलेले आहे. आता निवड समिती अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) सोपवली आहे. या पदावर विराजमान झाल्यावर दिलेल्या खास मुलाखतीमध्ये नाईक यांनी आपली परखड मते व्यक्त केली.
मुंबईच्या निवड समिती अध्यक्षपदाच्या आव्हानाकडे तुम्ही कसे पाहता?
यात आव्हान ते कसले? सध्या मी पश्चिम विभागाचा क्युरेटर प्रमुख म्हणून काम करतोच आहे, त्याचबरोबर यापूर्वीही मी निवड समितीमध्ये होतो. मुंबईत मी खेळलो असून बरीच वर्षे क्रिकेट क्षेत्रात कार्यरत आहे, त्यामुळे हे आव्हान नक्कीच नाही. पण ही जबाबदारी चोख आणि पारदर्शीपणे पार पाडण्याकडे माझा कल असेल.
नुकताच तुम्ही मुंबईचा संभाव्य संघ जाहीर केलात, यावेळी नेमके कोणते निकष तुम्ही लावले?
गुणवत्ता आणि कामगिरी हेच निकष संघ निवडतानामी पाळतो. मुंबईमध्ये बरेच युवा खेळाडू आहेत, ज्यांच्याकडून स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी होत आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये चांगली गुणवत्ता आहे. भारताच्या संघात सचिन तेंडुलकर आणि झहीर खान ही दोन मुंबईची मोठी नावे होती. पण आता हे दोघेही निवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघात मुंबईकर हवे असतील तर युवा खेळाडूंना संधी द्यायलाच हवी. कारण या वयात जर त्यांनी संधी दिली तर त्यांची भारतीय संघात निवड होऊ शकते. त्यामुळे संघ निवडताना मी युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करतो.
निवड समितीचे अध्यक्ष म्हणून तुमच्या काय योजना असतील?
तरुण, गुणवान, होतकरू खेळाडूंना संधी द्यायली हवी, पण त्याचबरोबर संघात जे जास्त वयाचे खेळाडू आहेत, त्यांना हळूहळू बाजूला करायला हवे. मुंबईचा संघ हा अव्वल कसा बनवता येईल, याकडे माझे लक्ष असेल.
कोणतीही संघटना किंवा समिती म्हटली की त्यामध्ये राजकारण असते, शह-काटशह आणि हेवेदावे असतात, याबद्दल काय सांगाल?
एमसीएमध्ये राजकारणच जास्त आहे आणि खेळाकडे लक्ष देणारे फार कमी आहेत. फक्त काही हातावर मोजणाऱ्या लोकांना क्रिकेटच्या भवितव्याची चिंता आहे. ज्यांनी कधी हातात बॅट धरली नाही ते क्रिकेटचे राजकारण करताना दिसतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आता रवी सावंत अध्यक्ष झाल्यापासून काही गोष्टी बदलल्या आहेत. सावंत हे खेळावर लक्ष केंद्रित करणारे व्यक्ती आहेत, त्यांचा चांगला पाठिंबा आम्हाला मिळतो.
तुम्ही स्पष्टवक्ते आहात, त्यामुळे या राजकारणाचा तुम्हाला फटका बसेल असे वाटते का?
मला नाही वाटत. कारण मी माझे काम प्रामाणिकपणे करतो. मला राजकारण करायचे नाही आणि करणारही नाही. क्रिकेट हा खेळ आणि मुंबईचा संघ अधिक सक्षम कसा होईल, हेच माझे ध्येय आहे.
मुंबईने या वर्षी रणजीचे जेतेपद पटकावले, या संघाबद्दल तुम्ही काय सांगाल?
मुंबईने रणजी करंडक जिंकला, पण इराणी चषक मात्र जिंकता आला नाही. मुंबईची फलंदाजी चांगली आहे, पण गोलंदाजी हा कच्चा दुवा आहे. आतापर्यंत मुंबईची एवढी कमकुवत गोलंदाजी मी पाहिलेली नाही. आपल्याकडे चांगले वेगवान गोलंदाज नाहीत, तर एकाही फिरकीपटूचा दर्जा चांगला नाही. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी सुधारावी लागेल.
यासाठी कोणते प्रयत्न करणार आहात?
नक्कीच, संघ सक्षम आणि बळकट होण्यासाठी काही योजना आहेत. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या विभागांचा स्वतंत्र प्रशिक्षक असायला हवा, असे मला वाटते आणि त्याप्रमाणेच योजना आखण्याचे ठरवले आहे.
प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे?
सुलक्षण एक चांगला प्रशिक्षक आहे. संघामधील त्याचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे. तो संघाच्या बाबींमध्ये एवढा कार्यमग्न असतो की ते सोडून दुसरा विचार त्याच्या मनात नसतो. चांगली रणनीती तो आखतो, त्याचबरोबर खेळाडूंच्या तंदुरुस्तीकडेही त्याचे बारकाईने लक्ष असते.