मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त झाला असला तरी त्याच्या नावाला असलेले वलय कमी झालेले नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) कांदिवली जिमखान्याला सचिनचे नाव देऊन त्याला काही दिवसांपूर्वी सन्मानित केले होते. त्यानंतर मंगळवारी (३ डिसेंबर) एमसीए वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये सचिनला पुन्हा एकदा सन्मानित करणार आहे. सचिनबरोबरच या वेळी हॅरिस शिल्ड आंतरशालेय स्पर्धेमध्ये प्रथमच पाचशे धावा रचणाऱ्या रिझवी शाळेच्या पृथ्वी शॉ आणि कांगा लीग स्पर्धेमध्ये २० विकेट्स मिळवणाऱ्या युवा मुशीर खान यांचाही या वेळी सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रम जाहीर करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष या नात्याने शरद पवार या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार होते. पण एमसीएच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यास दिवाणी न्यायालयाने केलेल्या मज्जावास उच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती देत तूर्त दिलासा दिला असल्याने ते या कार्यक्रमाचे अध्यक्षपद एमसीएचे अध्यक्ष या नात्याने भूषवणार आहे.
‘‘सचिन तेंडुलकरचा आम्ही वांद्रे-कुर्ला संकुलातील अकादमीमध्ये ३ डिसेंबरला सत्कार करणार आहोत.  शरद पवार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. सचिनला या वेळी एमसीएकडून खास चित्र भेट देणार आहोत,’’ असे एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले.
या कार्यक्रमाबाबात अधिक माहिती देताना सावंत म्हणाले की, ‘‘ यंदाच्या हॅरिस शिल्डमध्ये ५४६ धावांची खेळी साकारणाऱ्या पृथ्वी शॉ आणि कांगा लीग स्पर्धेत सर्वात लहान वयामध्ये ‘जी’ गटातून खेळताना २० विकेट्स मिळवणाऱ्या मुशीर अहमद खान यांचाही सत्कार करण्यात येईल. सचिनबरोबर या दोघांचा सत्कार केल्यामुळे पृथ्वी आणि मुशीर या दोघांनाही प्रेरणा मिळेल.’’
वानखेडेवरील दोनशेव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी ११ नोव्हेंबरला कांदिवली जिमखान्याला सचिनचे नाव देऊन त्याला सन्मानित करण्यात आले होते. या वेळी वांद्रे-कुर्ला संकुलाच्या अकादमीला शरद पवार यांचे नाव देण्याचा सोहळा होणार आहे.