वासिम जाफर आणि चंद्रकांत पंडीत या दोन बिनीच्या शिलेदारांना प्रशिक्षकपदी नेमण्याची संधी गमावल्यानंतर, मुंबई क्रिकेट असोसिएशनला टीका सहन करावी लागली होती. गेल्या काही वर्षांतली मुंबईची रणजी क्रिकेट स्पर्धेतली कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. भारताचे माजी कर्णधार आणि मुंबईकर खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी MCA च्या वेळकाढू धोरणावर नाराजी व्यक्त केली होती. बाकीच्या संघांनी प्रशिक्षकांची नेमणूक करुन पुढील हंगामाची तयारी सुरु केलेली असताना MCA ला जाग आलेली आहे. प्रशिक्षकांची निवड करण्याचे अधिकार असलेल्या Ad-Hoc Cricket Improving समितीत गावसकरांनी सहभागी होण्याची विनंती MCA ने केल्याचं समजतंय.

सुनिल गावसकर यांच्यासोबतच MCA समीर दिघे आणि लालचंद राजपूत या माजी मुंबईकर खेळाडूंचीही मदत घेणार आहे. “तिन्ही माजी खेळाडूंना MCA ने विनंती केली आहे, प्रशिक्षक निवडीच्या कामात ते मदत करतील अशी अपेक्षा आहे. ते प्रशिक्षकपदासाठी ऑनलाईन मुलाखती घेऊ शकतात. तिन्ही खेळाडू हे अनुभवी आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा मुंबईला होऊ शकतो.” MCA च्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली. काही महिन्यांपूर्वी चंद्रकांत पंडीत यांना मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने तर वासिम जाफरला उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने प्रशिक्षकपदावर नेमलं आहे.

MCA च्या नवीन संविधानानुसार प्रशिक्षक निवड समितीची स्थापना सर्वसाधारण सभेत होणं अपेक्षित आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत सर्वसाधारण सभा घेणं MCA ला शक्य नाहीये. त्यामुळे मुंबई संघाच्या प्रशिक्षक निवडीचं काम ठप्प पडलं आहे. MCA च्या वरिष्ठ कार्यकारणीने सर्व सभासदांना १० जुलैपर्यंत सर्वसाधारण सभेबद्दल आपली मतं कळवायला सांगितली आहेत. जे सभासद आपली मतं कळवणार नाहीत, त्यांचा निर्णयाला पाठींबा आहे असं धरलं जाईल. काही दिवसांपूर्वी MCA ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून क्रिकेटचा सराव कधी सुरु करता येईल याबद्दल विचारलं होतं. त्यामुळे मुंबईच्या प्रशिक्षकपद निवडीवर काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.