करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका इतर क्रीडा संघटनांप्रमाणे बीसीसीआयलाही बसला आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ देशात एकही आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक सामना खेळवण्यात आलेला नाही. स्पर्धा रद्द झाल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसीने काही दिवसांपूर्वी खेळाडूंना सरावाची परवानगी दिली होती. मात्र यासाठी स्थानिक सरकारी यंत्रणांची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात अद्याप सरकारने क्रिकेटचा सराव करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून क्रिकेट कधी सुरु करता येईल अशी विचारणा केली आहे.

“हजारो खेळाडू क्रिकेटचा सराव सुरु कधी होतोय याची वाट पाहत आहेत. लॉकडाउन काळात या सर्व खेळाडूंनी मोठ्या धीराने घरी राहून या परिस्थितीचा सामना केला आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता, आपल्याला या विषाणूसोबतच जगावं लागेल असं दिसतंय.” त्यामुळे क्रिकेटचा सराव सुरु कधी करता येईल आणि त्यासाठी नियम जाहीर करण्याची विनंती MCA चे सेक्रेटरी संजय नाईक आणि जॉईंट सेक्रेटरी शाहआलम शेख यांनी पत्रात केली आहे. आतापर्यंत MCA ने राज्य सरकारच्या सर्व नियमांचं पालन केलं आहे आणि यापुढेही करत राहिलं असा विश्वास MCA ने दर्शवला आहे. मुंबई शहरासह, उपनगर, ठाणे, पालघर, नवी मुंबई या परिसरातले खेळाडू हे MCA च्या कार्यक्षेत्रात येतात.

करोना विरुद्ध लढ्यात MCA ने आपलं सामाजिक कर्तव्य ओळखत मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाखांची मदत केली होती. याव्यतिरीक्त MCA च्या अखत्यारीत येणारी मैदानं क्वारंटाइन सुविधेसाठी देण्याची तयारीही MCA ने दर्शवली होती. त्यामुळे आगामी काळासाठी राज्य सरकारने क्रिकेट कधी सुरु करता येईल याबद्दल स्पष्ट माहिती द्यावी अशी विनंती MCA ने आपल्या पत्रात केली आहे. सरकारने सराव सुरु करण्यासाठी मार्गदर्शक नियम जाहीर केल्यास खेळाडूंसाठी ते अत्यंत सोयीचं होईल असं MCA ने म्हटलं आहे.