कसोटी क्रिकेटच्या उत्कर्षांसाठी ‘एमसीसी’ जागतिक क्रिकेट समितीच्या शिफारशी

लंडन : क्षणगणक, नोबॉलसाठी मुक्त फटकेबाजी (फ्री हिट) आणि पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी प्रमाणित चेंडू असे काही मुद्दे मेरिलिबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) जागतिक क्रिकेट समितीने कसोटी क्रिकेटला अधिक लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित केले आहेत.

गेल्या आठवडय़ात बंगळूरु येथे इंग्लंडचे माजी संघनायक माइक गेटिंग यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीची बैठक झाली. या समितीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचाही समावेश आहे. या बैठकीत कसोटी क्रिकेटच्या उत्कर्षांसाठी सुचवण्यात आलेले काही बदल मंगळवारी ‘एमसीसी’च्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले.

षटकांची धिमी गती ही पाच दिवसांच्या क्रिकेटसाठी डोकेदुखी ठरते. त्यामुळेच क्रिकेटचाहते कसोटी क्रिकेटपासून दुरावतात. यावर मात करण्यासाठी वेळेचे बंधन घालण्याची सूचना या बैठकीत करण्यात आली.

‘‘कसोटी क्रिकेटला चाहत्यांचा प्रतिसाद कमी लाभतो. यासंदर्भातील सर्वेक्षणात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेमधील २५ टक्के चाहत्यांनी षटकांची धिमी गती हे कारण नमूद केले आहे. कारण या देशांमध्ये फिरकी गोलंदाजांच्या वाटय़ाला कमी षटके येतात. त्यामुळे दिवसभराच्या खेळात ९० षटकांचा खेळ होणे कठीण जाते. अगदी ३० मिनिटांच्या अतिरिक्त खेळातसुद्धा ती पूर्ण करता येत नाहीत,’’ असे ‘एमसीसी’ने म्हटले आहे. खेळातील वेळ वाया जाण्यास बऱ्याचदा पंच आढावा प्रक्रियासुद्धा (डीआरएस) जबाबदार असते. या बैठकीत कसोटी सामन्यांना गती देण्यासाठी अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाल्या.

कसोटी क्रिकेटसाठी लाल रंगाचा डय़ूक्स चेंडूच सर्वत्र वापरण्यात यावा, अशी सूचना भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन यांनी केली आहे. याचप्रमाणे नोबॉलसाठी मुक्त फटकेबाजीची तरतूद मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्यांचे प्रमाण कमालीचे घटले आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी तर यावर उत्तम नियंत्रण राखले आहे. परंतु वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत मात्र त्यांनी ११ नोबॉल चेंडू टाकले होते.

 ‘एमसीसी’च्या क्रिकेट समितीने कसोटी सामन्यांसाठी केलेल्या शिफारशी-

१. धावफलकावर कोणत्याही कृतीसाठी नियोजित वेळ दाखवला जाईल. म्हणजे षटकाचा पुकार झाल्यापासून ४५ सेकंदांची उलटगणती दाखवली जाईल (यात नव्या फलंदाजासाठी ६० सेकंदांचा आणि गोलंदाजाच्या बदलासाठी ८० सेकंदांचा अधिक वेळ दिला जाईल.). घडय़ाळात शून्य झाल्यानंतरही खेळ सुरू होऊ शकला नाहीत, तर जबाबदार नसलेल्या संघाला पाच अतिरिक्त गुण देण्यात येतील.

२. फलंदाज बाद झाल्यानंतर आणि पेयपानासाठीसुद्धा (ड्रिंक ब्रेक) अशा प्रकारची वेळ लावण्यात येईल. जी खेळपट्टी ते ड्रेसिंगरूम यांच्यातील अंतरावर अवलंबून असेल. फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी घडय़ाळात शून्य दाखवण्याआधी सज्ज होणे क्रमप्राप्त असेल.

३. पंच आढावा प्रक्रियेच्या (डीआरएस) प्रसंगी टीव्ही प्रक्षेपण कंपनीने निर्णय स्पष्ट करताच त्वरेने सामना सुरू करावा.

४. सध्या भारतात एसजी, इंग्लंड-विंडीजमध्ये डय़ूक्स आणि ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेत कुकाबुरा चेंडू वापरला जातो. मात्र विश्वचषक स्पर्धेनंतर सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी एकच प्रमाणित चेंडू वापरण्यात यावा.

५. नोबॉलसाठी मुक्त फटकेबाजीची (फ्री हिट) तरतूद असावी.