कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमच्या विक्रमी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी ४२९ धावांचा डोंगर रचला.
मॅक्क्युलमने ७४ चेंडूत शतक पूर्ण करत कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडतर्फे वेगवान शतकाचा स्वत:चा विक्रम मोडत नवा विक्रम रचला. वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये हजार धावा करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला. सुरंगा लकमलच्या एका षटकात २६ धावा चोपून काढत एका षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याच्या न्यूझीलंडच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. विक्रमी द्विशतकाकडे कूच करणाऱ्या मॅक्क्युलमला अखेर कौशलने बाद केले. मॅक्क्युलमने १३४ चेंडूत १८ चौकार आणि तब्बल ११ षटकारांची लयलूट करत १९५ धावा केल्या. बाद झाल्याने कसोटीतील डावात सर्वाधिक षटकारांचा वासिम अक्रमचा विक्रम एका षटकाराने हुकला.
गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर श्रीलंकेने न्यूझीलंडला फलंदाजांसाठी आमंत्रित केले. ३ बाद ८८ अशा स्थितीत मॅक्क्युलमचे आगमन झाले आणि त्याच्या खेळीने सामन्याचा नूर पालटला. त्याने चौथ्या विकेटसाठी केन विल्यमसनसह १२६, तर पाचव्या विकेटसाठी जेम्स नीशामसह १५३ धावांची भागीदारी केली.
नीशामने ८० चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली. पदार्पण करणाऱ्या थरिंदू कौशलच्या २२ षटकांत न्यूझीलंडने १५९ धावा वसूल केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या ७ बाद ४२९ धावा झाल्या आहेत.