News Flash

मोटेराच्या खेळपट्टीवर प्रसारमाध्यमांचे ताशेरे

मोटेराच्या खेळपट्टीवर यापुढे किमान पुढील वर्षभर तरी आंतरराष्ट्रीय सामने खेळवू नयेत

(संग्रहित छायाचित्र)

भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी दोन दिवसांतच संपल्यामुळे विदेशातील प्रसारमाध्यमांनी मोटेराच्या खेळपट्टीवर ताशेरे ओढले आहेत.

मोटेराच्या खेळपट्टीवर यापुढे किमान पुढील वर्षभर तरी आंतरराष्ट्रीय सामने खेळवू नयेत. परंतु ‘बीसीसीआय’कडून सर्वाधिक नफा मिळत असल्याने ‘आयसीसी’ हा निर्णय घेणार नाही. तसेच स्टेडियमच्या नावातच दुसरे कारण सामावले आहे, अशा आशयाचे वृत्त ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे. ‘द मिरर’ या वृत्तपत्राने मोटेराची खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी योग्य नसल्याचे वृत्त छापले. ‘मोटेराच्या खेळपट्टीवर सामना खेळवून भारताने खिलाडूवृत्ती दाखवलेली नाही. त्यामुळे त्यांचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील गुण कमी करण्यात यावे,’’ असा मथळा त्या बातमीत आहे.

‘द सन’, ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रांनी इंग्लंडच्या फलंदाजीविषयी टीका करतानाच तीन वेगवान गोलंदाज निवडण्याच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. गेल्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूलाच आपण पुढील लढतीत खेळणार की नाही, हे ठाऊक नसल्याने इंग्लंडची अशी गत झाली आहे, असे वृत्त छापून त्यांनी इंग्लंडच्या ‘खेळाडू व्यवस्थापन धोरणा’कडेही (रोटेशन पॉलिसी) लक्ष वेधले.

इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंची मतमतांतरे

लंडन : मोटेराच्या खेळपट्टीवरून इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी भिन्न मते व्यक्त केली आहेत. काहींनी खेळपट्टीला दोषी ठरवले आहे. तर काहींनी इंग्लंडच्या फलंदाजांवर ताशेरे ओढले आहेत.

इंग्लंडने अतिशय सुमार फलंदाजी केली. चेपॉकवर दुसऱ्या कसोटीत झालेल्या पराभवातून त्यांनी बोध घेतला नाही. ही खेळपट्टी दुसऱ्याच दिवशी ८१ धावांत गारद होण्यासारखी मुळीच नव्हती. त्यामुळे खेळपट्टीला दोष देण्यापेक्षा इंग्लंडने फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

नासिर हुसेन, इंग्लंडचा माजी कर्णधार

विराट कोहलीने केलेली खेळपट्टीची पाठराखण पाहून मला आश्चर्य वाटले. इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली, परंतु म्हणून तुम्ही फक्त फलंदाजांवर खापर फोडू शकत नाही. खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी योग्य नव्हती. त्यामुळेच दोन दिवसांत निकाल लागला.

अ‍ॅलिस्टर कूक, इंग्लंडचा माजी फलंदाज

इंग्लंड भविष्याचा फार विचार करत आहे. अ‍ॅशेसइतकीच भारताविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वपूर्ण असूनही इंग्लंड महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देत आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट मंडळ आणि संघव्यवस्थापनाने लवकरच खेळाडू व्यवस्थापन धोरण पूर्णपणे बरखास्त करावे अथवा त्यामध्ये काही बदल करावेत.

इयान बेल, इंग्लंडचा माजी फलंदाज

कसोटी सामना दोन दिवसांत संपणे, ही गोष्टच मनाला पटत नाही. दोन्ही संघांतील फलंदाजांनी सुमारच खेळ केला, परंतु भारताचे गोलंदाज इंग्लंडपेक्षा वरचढ ठरले. मात्र अशा खेळपट्टीवरच सामने आयोजित करायचे असल्यास एका संघाला तीनदा फलंदाजी करण्याची संधी द्यावी.

मायकेल वॉन, इंग्लंडचा माजी कर्णधार

खेळपट्टीमुळे आमचा अपेक्षाभंग -सिल्वरवूड

मोटेराची खेळपट्टी फिरकीपटूंना लाभदायक असेल, हे ठाऊक होते. परंतु दोन दिवसांतच सामना संपल्याने आमचा अपेक्षाभंग झाला, असे मत इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी व्यक्त केले. ‘‘भारताने आमच्यापेक्षा सरस खेळ केला, परंतु प्रकाशझोतातील कसोटीतही खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पहिल्या दिवसापासूनच इतकी लाभदायक ठरेल, याची आम्हाला कल्पना नव्हती. किमान चौथ्या दिवसापर्यंत कसोटी लांबेल, असे आम्हाला वाटले होते. मात्र आमच्या पदरी निराशा पडली. खेळपट्टीविषयी अधिक भाष्य करण्यासाठी मी उत्सुक नाही,’’ असे सिल्वरवूड म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 12:40 am

Web Title: media objections to motera pitch abn 97
Next Stories
1 चौथ्या कसोटीतही फिरकीपटूंचेच वर्चस्व!
2 मैदानावर विराटच्या नजरेला नजर भिडवणारा सूर्यकुमार आता त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबद्दल म्हणतो…
3 हिमा दास आसामच्या पोलीस उपअधीक्षक पदी
Just Now!
X